अनिल कांबळे
नागपूर,
police constables राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना बढती मिळावी यासाठी सन २०१३ ला पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील शेकडो पोलिस कर्मचारी हे अधिकारी पदासाठी पात्र ठरले होते. मात्र, त्या कर्मचाऱ्यांना तब्बल गेल्या १३ वर्षांनंतर पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.
राज्याचे तत्कालिन महासंचालकांनी सन २०१३ ला पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना अधिकारी होता यावे, यासाठी पोलिस उपनिरीक्षक पात्रता परीक्षा घेतली होती. त्यामुळे पोलिस दलात कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांना सुवर्ण संधी देण्यात आली. त्यात जवळपास १७ हजार पोलिस कर्मचारी उत्तीर्ण झाले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर संधी देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सकारात्मक प्रयत्न झाले नव्हते. शेवटी प्रसारमाध्यमांनी या विषयाला वाचा फोडली. त्यामुळे राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या बघता पोलिस अधिकारी पदावर बढती देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार नुकताच पोलिस महासंचालक कार्यालयाने २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ३३३ पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल १३ वर्षांनंतर अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड यादी जारी केली आहे. येत्या महिन्याभरात राज्यातील ३३३ पोलिस कर्मचारी थेट पोलिस अधिकारी होणार आहेत.
ज्येष्ठता यादीत गंभीर चुका
गेल्या २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक police constables पदासाठी पात्र ठरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी लावण्यात आली. या यादीत अनेक त्रुटी असून गंभीर चुका असल्याची ओरड आहे. अनेक निवृत्त झालेल्या अंमलदारांची नावे अद्याप यादीत आहेत. तसेच एका पोलिस कर्मचाऱ्याचे नाव दोन जिल्ह्यात असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंमलदारांमध्ये नाराजी आहे.
पीएसआयच्या २३६६ जागा रिक्त
गेल्या वर्षभरापासून राज्यात पोलिस उपनिरीक्षकांच्या सुमारे २ हजार ३६६ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये मुंबई ३७२, ठाणे १७१, नाशिक १००, पुणे २५५, नागपूर २२३, अमरावती ८८, छत्रपती संभाजीनगर ९०, कोकण ९२, तर नाशिक ग्रामीण ९५ रिक्त जागा आहेत. पोलिस उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे उपलब्ध पोलिस अधिकाऱ्यांवार कामाचा ताण आला आहे. बंदोबस्त, तपास, आरोपपत्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि अन्य जबाबदाऱ्यांमध्ये अधिकारी गुंतले आहेत.