हास्यजत्रा’च्या लेखकाचा अपघाती मृत्यू

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Accidental death of ‘Hasyajatra’ writer महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सातत्याने हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कार्यक्रमाच्या पडद्यामागे विनोदाची निर्मिती करणारे लेखक विजय कुमार राख यांचे रात्री झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती लेखन टीममधील सचिन गोस्वामी यांनी दिली. विजय कुमार यांच्या अचानक झालेल्या निधनाने हास्यजत्रा टीमसह कलाक्षेत्र आणि त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
 

AS343 
 
विजय कुमार राख हे मराठवाड्यातील होतकरू लेखक म्हणून ओळखले जात होते. विनोदाची अचूक जाण असण्यासोबतच ग्रामीण जीवनातील बारकावे आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडण्याची त्यांची हातोटी होती. कमी वयात त्यांचे निधन झाल्याने सृजनशील क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत विजय कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम सहभागी असल्याचे म्हटले. गोस्वामी यांच्या पोस्टनंतर अनेकांनीही विजय कुमार यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला.
 
 
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रदर्शित होतो. प्रसाद ओक, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी आणि समीर चौधरी यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. कार्यक्रमाच्या पडद्यामागे लेखकांचीही महत्त्वाची भूमिका असते. सचिन गोस्वामी आणि अरविंद जगताप यांच्यासोबत इतर लेखकांची टीम कार्यरत असून, याच सृजन टीममध्ये विनोदी लेखक म्हणून विजय कुमार राख योगदान देत होते. त्यांच्या निधनामुळे हास्यजत्रेच्या पडद्यामागील एका महत्त्वाच्या सदस्याला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.