चांडोळ येथील प्राचीन जैन मूर्तींचे जतन करा

जैन समाजाची मागणी

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
बुलडाणा, 
ancient Jain idols at Chandol चांडोळ येथे पुरातन काळातील जैन तीर्थंकरांच्या मूर्ती व मंदिराचे अवशेष आढळून आले असून, सध्या या प्राचीन मूर्ती भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित स्थितीत असल्याचे समोर आले आहे. या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे तातडीने जतन, संवर्धन करून मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशी मागणी अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, बुलडाणा जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच पुरातत्त्व विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार चांडोळ येथील मौजे चांडोळ येथे नृसिंह व विठ्ठल रुमाई संस्थान मंदिर परिसरात प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती व मंदिराचे अवशेष आढळून आले. या ठिकाणी एक मूर्ती कायोत्सर्ग मुद्रेत उभी असून, दोन मूर्ती पद्मासन ध्यानमुद्रेत बसलेल्या आहेत. तसेच मंदिराचे स्तंभ, शिखराचे तुकडे व नक्षीकाम केलेले दगड आढळले आहेत. संबंधित मूर्ती काळ्या बेसॉल्ट दगडातील असून त्यांचा कालखंड साधारणत १०व्या ते १२व्या शतकातील (यादवकालीन हेमाडपंथी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मूर्ती सुमारे ९०० ते ११०० वर्षे जुन्या असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
ty65766786787
 
 
मात्र सध्या या प्राचीन मूर्ती मंदिर परिसरात पडलेल्या असून त्यांची नासधूस होण्याची किंवा चोरी होण्याची शयता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या वारशाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. चांडोळ येथील प्राचीन जैन मूर्ती व अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी तातडीने पंचनामा करून मूर्ती सुरक्षित व संरक्षित ठिकाणी हलवाव्यात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (अडख), नागपूर मंडळ तसेच महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणी करून या वास्तूचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशी मागणी जैन समाजाने केली आहे. या जागेला प्राचीन स्मारक म्हणून संरक्षित घोषित करून संवर्धन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या प्राचीन मूर्तींचे तातडीने जतन व्हावे, अशी भावना जैन समाजातून व्यक्त होत आहे. प्रशासन व पुरातत्त्व विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्राचीन वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.