अजित दादांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण!

बीड-पुणे रेल्वे सुरू

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
बीड,
Beed-Pune railway service launched मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडकरांच्या रेल्वे प्रवासाला आणखी मोठी जोड मिळाली आहे. बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर ही रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली. गेल्यावर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्यानंतर आता १७ सप्टेंबरलाच बीड-पुणे एक्स्प्रेस सुरू झाल्याने बीडकरांचा पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
 
 
SUNERTRERS
 
रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या बीड रेल्वे प्रकल्पातील योगदानाची आठवण करून दिली. गेल्यावर्षी बीड-अहिल्यानगर रेल्वेच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी पुढील वर्षी बीडहून थेट पुण्याला प्रवास करता येईल, असा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाली, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सरकारकडून मिळालेला निधी, अजित पवार यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या रेल्वेमुळे बीडमधील व्यापाऱ्यांनाही मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
बीडची कनेक्टिव्हिटी आणि विकास हा आपला प्रमुख ध्यास असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेल्या बीड ते पनवेल थेट रेल्वे प्रवासाच्या अपेक्षेचाही त्यांनी उल्लेख केला. बीडच्या पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याचे आश्वासन देत, अजित पवार यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सोनवणे यांनी मांडलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असून, सर्वांनी मिळून बीड आणि मराठवाड्याच्या विकासाला नवे वळण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.