टाटांच्या गादीवर चंद्रशेखरनच!

आणखी ५ वर्षांची मुदतवाढ

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Chandrasekaran to lead Tata Group टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे. टाटा सन्सच्या मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्षपदी आणखी पाच वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार होता. त्यामुळे त्यापूर्वीच त्यांच्या पुढील कार्यकाळाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये चंद्रशेखरन यांनी सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे टाटा सन्सच्या मंडळाला कळवले होते. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा सुरू झाली होती. आता मात्र मंडळाने त्यांना पुन्हा पाच वर्षांची मुदत देण्याचा निर्णय घेतल्याने नेतृत्वातील बदलाची शक्यता तूर्तास बाजूला पडली आहे. त्यांच्या निर्णयातील या बदलामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
 
 

chandra 
 
एन. चंद्रशेखरन यांनी २०१७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची दुसऱ्यांदा पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. आता मंजूर झालेली मुदतवाढ हा त्यांचा तिसरा पाच वर्षांचा कार्यकाळ ठरणार आहे. टाटा ट्रस्ट्सकडून यापूर्वी त्यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराला पाठिंबा देण्यात आला होता; मात्र फेब्रुवारीतील मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, टाटा सन्सच्या भविष्यातील रचनेशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सला समभाग बाजारात सूचीबद्ध होण्याच्या नियमांतून सूट देण्याची मागणी अलीकडेच फेटाळली होती. त्यानंतर टाटा सन्सच्या सूचीकरणाचा मुद्दाही मंडळाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला. उपलब्ध वृत्तांनुसार, १७ सप्टेंबरच्या बैठकीत कंपनीच्या सूचीकरणाबाबतही पुढील प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.