उपग्रहातून उघड झाला चीनचा ‘पाताळ प्लॅन’!

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
बीजिंग,
China's Diabolical Plan चीनच्या नौदलाची समुद्रातील क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेली एक अत्याधुनिक तयारी उपग्रह छायाचित्रांमुळे समोर आली आहे. शांघाय येथील हुडोंग-झोंगहुआ जहाजबांधणी कारखान्यात एका मोठ्या ‘मदरशिप’ची निर्मिती सुरू असल्याचे या छायाचित्रांमधून दिसून आले आहे. चालकाविना चालणाऱ्या मोठ्या ड्रोन पाणबुड्या समुद्रात नेऊन त्यांना तेथून तैनात करण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.अमेरिकेतील संरक्षण गुप्तचर क्षेत्रातील कंपनी वॅन्टोरने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांनुसार, या मदरशिपमध्ये एकाच वेळी चार विशाल स्वयंचलित पाणबुड्या म्हणजेच एक्सएक्सएलयूयूव्ही नेण्याची क्षमता असू शकते. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, जहाजाच्या आतील भागात स्वतंत्र हँगर असून त्यात १२ उभ्या उचल यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. जहाजाची रचना आणि आकार पाहता त्याचा उपयोग प्रामुख्याने नौदलाशी संबंधित मोहिमांसाठी केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

China 
 
चीन विकसित करत असलेल्या या चालकविरहित पाणबुड्यांचा आकारही मोठा आहे. त्यातील सर्वात मोठी पाणबुडी सुमारे १४८ फूट लांब असल्याचे सांगितले जाते. ही अमेरिकन नौदलाच्या ‘ओर्का’ ड्रोन पाणबुडीपेक्षा जवळपास तीनपट, तर ब्रिटनच्या ‘एक्सकॅलिबर’पेक्षा चारपट मोठी आहे. चालकविरहित असलेल्या या पाणबुड्या हजारो मैलांचा प्रवास करून शत्रूच्या भागात गुप्तपणे पोहोचू शकतात आणि जड टॉरपीडो तसेच इतर शस्त्रांचा वापर करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे वृत्त आहे.जहाजबांधणीच्या क्षमतेच्या बाबतीत चीन सध्या अमेरिकेपेक्षा पुढे असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेकडे सध्या २९५ युद्धनौका असून चीनकडील युद्धनौकांची संख्या ४०० पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या प्रकारच्या मदरशिपमुळे चीनच्या नौदल क्षमतेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तैवान तसेच दक्षिण चीन समुद्रासारख्या वादग्रस्त भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन आपली समुद्री उपस्थिती मजबूत करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीन तैवानवर आपल्या नियंत्रणाचा दावा करतो, तर दक्षिण चीन समुद्रातही शेजारी देशांच्या विरोधादरम्यान आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, बीजिंगमध्ये झालेल्या शियांगशान फोरममध्ये चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांनी इतर देशांनी सैन्यवाद आणि वर्चस्ववादापासून दूर राहावे, असे आवाहन केले. जाणकारांच्या मते, त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जपान आणि अमेरिकेकडे असू शकतो. या दोन्ही देशांकडून परिसरातील चीनच्या वाढत्या समुद्री सामर्थ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.