आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवरून वाद!

पाकिस्तानची मागणी भारताने फेटाळली

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Controversy over Asian Hockey Champions Trophy भारतात होणाऱ्या पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या आयोजनावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार असून, पाकिस्तान हॉकी फेडरेशनने स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची मागणी आशियाई हॉकी फेडरेशनकडे केली आहे. मात्र, हॉकी इंडियाने ही मागणी मान्य केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष मोहुद्दीन अहमद यांनी भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधांचा दाखला देत संपूर्ण स्पर्धा भारताबाहेर हलवावी किंवा पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. भारतात पाकिस्तानी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मात्र, हॉकी इंडियाचे महासचिव भोलानाथ सिंग यांनी पीटीआयशी बोलताना ठिकाण बदलण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे सांगितले. पाकिस्तानला स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास भारतात यावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 

Controversy over Asian Hockey Champions Trophy
 
 
भोलानाथ सिंग यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास ओमान आणि बांगलादेश हे पर्यायी संघ उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्याही एका संघाला पाकिस्तानच्या जागी सहभागी करून घेतले जाऊ शकते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पाकिस्तानी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, एका अहवालानुसार, पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्याने पाकिस्तानी संघाला भारतात येण्यासाठी अद्याप सरकारकडून परवानगी मिळालेली नसल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानने यापूर्वीही भारतातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत अशाच प्रकारची भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी भारतात येण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. त्यानंतर अशाच कारणांचा हवाला देत आशिया चषकातूनही माघार घेतली होती. पंजाबमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये भारत, पाकिस्तान, मलेशिया, चीन, जपान आणि कोरिया असे एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.