मोहित खेडीकर
नागपूर,
Dark clouds of drought over Vidarbha विदर्भात उशिरा आलेला मान्सून, पावसाचे असमान वितरण आणि ऑगस्ट महिन्यात पडलेला दीर्घ खंड यामुळे यंदाचा खरीप हंगाम पुरता अडचणीत सापडला आहे. परिणामी, विदर्भावर दुष्काळाचे काळे ढग दाटून आले आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची धडधड वाढली असून, राज्य सरकारही सतर्क झाले आहे. हवामान विभागाने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. यानुसार राज्यातील ३६ पैकी १८ जिल्ह्यांमध्ये सरासरी ४० टक्क्यांच्या वर पावसाची तूट निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये अगदी सरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाच्या पिकांची अवस्था वाईट होती. त्यात पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाचा दीर्घ खंड पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस व तुरीला मोठा फटका बसला. पावसाची मोठी तूट निर्माण झालेल्या राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर व चंद्रपूरचा समावेश आहे. यंदाच्या लहरी पाऊसमानामुळे खरीप हंगाम पुरता हातून गेला, परतीच्या पावसाची कृपा झाली तरच थोडेफार उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडू शकते.
सरकारी यंत्रणा लागली कामाला
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच नागपूर येथे राज्यातील दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांंच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून संभावित दुष्काळी परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. महसूलमंत्र्यांनी या परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला असून, त्यांनीही राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. त्यानुसार राज्यात ५ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
धरणेही तहानलेलीच
विदर्भातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच असून, विहिरी व स्थानिक जलाशयांतील पाणीपातळी खालावलेलीच आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर पिण्याच्या पाण्यासह आगामी रब्बी हंगामही अवलंबून आहे.
पूर्व विदर्भाला दिलासा
पूर्व विदर्भात येणाऱ्या भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात आवश्यकतेनुसार वेळोवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या तरी धानपिकाची परिस्थिती चांगली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र बहुतांश भागात पावसाची तूट निर्माण झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक नाही.
पश्चिम विदर्भात गंभीर परिस्थिती
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे पिके अक्षरश: वाळली असून, काही शेतकऱ्यांनी पिकावर रोटावेटर फिरवला. सोयाबीन, कापूस व तुरीसह, संत्रा, मोसंबी, केळी आणि भाजीपाला उत्पादक शेतकरीही पुरते कोलमडले आहेत. परतीच्या पावसाने या भागात कृपा दाखवली तरी शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळणे अशक्यप्राय आहे.