‘डिजिटल अरेस्ट’ करुन वृद्धाची साडेचार लाखांनी फसवणूक

मुंबई पोलिस, ‘एनआयए’चे अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांचा कारनामा

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
digital arrest मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली खामला येथील ६५ वर्षीय व्यक्तीला साडेचार लाख रुपयांचा गंडा घातला. अटकेची भीती दाखवून आरोपींनी बँक खात्याची पडताळणी करण्याच्या बहाण्याने पीडिताकडून पैसे ऑनलाइन वळते केले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

digital arrest  
सुरेश भास्करराव पोहनकर (६५, रा. विभुराम अपार्टमेंट, जयप्रकाशनगर, खामला) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी पोहनकर यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण मुंबई पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आकाश शर्मा असल्याचे सांगितले. पोहनकर यांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले असून, या खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविण्यासाठी झाल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात पोहनकर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघू शकते, अशी धमकीही देण्यात आली. पुढील चौकशीसाठी एनआयएचा अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एकाने एनआयएचा अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲपवरून पोहनकर यांच्याशी संपर्क साधला. पुढील काही दिवस वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून तब्बल डझनभर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. सातत्याने चौकशी आणि अटकेची भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.
खाते पडताळणीच्या नावाखाली पैसे उकळले
आपले नाव या प्रकरणातून वगळण्यासाठी बँक खात्यांची पडताळणी करावी लागेल, असे सांगून आरोपींनी पोहनकर यांच्याकडून वैयक्तिक कागदपत्रे तसेच बँक खात्याची माहिती मिळविली. त्यानंतर आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये साडेचार लाख रुपये जमा करण्यास सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत करण्यात येईल, असेही आरोपींनी भासविले. आरोपींच्या सांगण्यावरून पैसे हस्तांतरित केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पोहनकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक, तोतयेगिरी, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी वापरलेली बँक खाती आणि मोबाइल क्रमांकांचा तपास करून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.