दिशा सालियन केस आता ‘लेडी सिंघम’च्या हाती

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मुंबई
disha salian case सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नव्याने एफआयआर दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात बड्या राजकीय आणि सार्वजनिक व्यक्तींची नावे चर्चेत असल्याने देशभराचे लक्ष या हाय प्रोफाइल तपासाकडे लागले आहे. आता या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयच्या स्पेशल क्राईम युनिटमध्ये कार्यरत पोलीस अधीक्षक (SP) सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विविध गुंतागुंतीच्या तपासांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’साठी सुवर्णपदक मिळवलेल्या पाहुजा यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास होणार आहे.
 

dishasalian,dishasaliancase,cbi,cbiprobes ,seemapahuja  
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमधील कालावधी कमी असल्याने दिशा सालियन प्रकरणाची चर्चा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या संदर्भातही झाली होती. आता सीबीआयने नव्याने एफआयआर नोंदवल्याने या तपासाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.
सीबीआयने 13 सप्टेंबर रोजी या प्रकरणात नवीन एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सीबीआयच्या पुढील तपासाकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीमा पाहुजा सध्या नवी दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयाच्या स्पेशल क्राईम युनिटमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कठीण गुन्हेगारी प्रकरणांचा तपास तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या विश्लेषणातील कामगिरीची दखल घेत त्यांना 2021 मध्ये ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ या सन्मानाने सुवर्णपदक देण्यात आले होते. त्यांच्या कारकिर्दीत देशातील अनेक संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास महत्त्वाचा ठरला आहे. 2024 मधील कोलकाता येथील बहुचर्चित आरजी कर रुग्णालयातील बलात्कार-हत्या प्रकरण, उत्तर प्रदेशातील हाथरस आणि उन्नाव बलात्कार प्रकरणे तसेच हिमाचल प्रदेशातील गाजलेल्या ‘गुडिया’ प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने दिशा सालियन प्रकरणात औपचारिक एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट, सामूहिक अत्याचार, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांशी संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे एफआयआरमध्ये सध्या कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले नाही. तपासादरम्यान उपलब्ध होणारे पुरावे आणि निष्कर्ष यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी भूमिका सीबीआयने स्पष्ट केली आहे.
आता 8 जून 2020 च्या रात्री नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याचा तपास सीमा पाहुजा आणि त्यांचे पथक करणार आहे. दिशा सालियनच्या मृत्यूच्या रात्री तिचा बॉयफ्रेंड रोहन रॉय याच्या घरी झालेल्या पार्टीत उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब पुन्हा नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्या रात्रीच्या घटनाक्रमाची पुनर्रचना करताना साक्षीदारांचे जबाब, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), डिजिटल डेटा आणि फॉरेन्सिक पुरावे यांची सांगड घातली जाणार आहे.
घटनेनंतर संबंधित कागदपत्रे किंवा पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार करण्यात आली होती का, याचाही तपास केला जाणार आहे. उपलब्ध पुराव्यांची साखळी तपासून 8 जूनच्या रात्रीच्या घटनांचा नेमका क्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सीबीआयकडून केला जाईल. त्यामुळे सीमा पाहुजा यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या नव्या तपासातून दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील आतापर्यंत अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांवर कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.