नवी दिल्ली
dusu election 2026 दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) २०२६च्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना नॉर्थ कॅम्पसमधील आर्ट्स फॅकल्टीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रचारादरम्यान सुरू झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटांकडून लाथा-बुक्क्यांसह काठ्यांचा वापर करण्यात आल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. या हिंसक संघर्षात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी हिंदू राव रुग्णालयात दाखल करण्यात आले.
१८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अगोदर घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली विद्यापीठ परिसरातील तणाव वाढला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर जिल्ह्याच्या डीसीपी निहारिका भट मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचारानंतर नॉर्थ कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विविध महाविद्यालयांच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांसोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मतदानाच्या अवघ्या २४ तास आधी आर्ट्स फॅकल्टी परिसरात झालेल्या या हाणामारीमुळे प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि एनएसयूआयकडून परस्परविरोधी आरोप करण्यात आले आहेत. अभाविपने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हरी मंदिर परिसरातील अभाविप सदस्यांच्या निवासस्थानी एनएसयूआयचे कार्यकर्ते घुसले आणि तेथे हल्ला केला, असा दावा अभाविपने केला आहे. त्या वेळी घरात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या आणि बैठक सुरू होती, असेही संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणानंतर एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा अभाविपने केला असून, संबंधित व्यक्ती एनएसयूआयच्या सोशल मीडिया ग्रुपशी संबंधित असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.
दरम्यान, एनएसयूआयने अभाविपचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एनएसयूआयचे उमेदवार विजय शंकर मीना आणि गोपाळ चौधरी यांच्या निवासस्थानांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप संघटनेने केला. निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा एनएसयूआयने केला आहे. तसेच उमेदवारांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही एनएसयूआयने केली आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हिंसक घटनेमुळे दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले असून, मतदानाच्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.