गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

अहमदाबादचा प्रवास आता रस्त्याने

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मुंबई
eknath shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले. याच दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडनगरहून अहमदाबादपर्यंतचा पुढील प्रवास शिंदे आता रस्त्याने करणार आहेत. त्यांच्या गुजरात दौऱ्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे.
 

eknath shinde helicopter technical issue in gujarat, vadnagar visit grabs attention 
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडोदरा येथेही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले नेते असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यात त्यांनी मोदींना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिंदे यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ‘सामना’ हे वृत्तपत्र मात्र याला अपवाद ठरले.
वडोदरा येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाषणही केले. गुजरातमधील या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
दरम्यान, अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास अर्धा तास एकाच गाडीतून प्रवास केला. शिंदे आणि अमित शाह यांच्यातील वाढती जवळीक सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार असून, त्यानंतर राज्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आता गुजरातमधील नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचा सहभाग आणि अमित शाह यांच्यासोबतची त्यांची उपस्थिती यामुळे या दौऱ्याची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचा दौरा सुरू असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल झाला आहे. वडनगरहून अहमदाबादचा पुढील प्रवास त्यांना आता रस्त्याने करावा लागणार आहे.