तळेगाव (शा.पंत),
fire to a truck loaded with wood तळेगाव वनपरिक्षेत्रच्या हद्दीतून अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याची माहिती तळेगाव वन विभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन लांबाडे व कर्मचारी कारवाईसाठी गेले असता त्यांना अवैध लाकूड असलेला ट्रक दिसला. चौकशी केली असता आरोपीने वन विभागाच्या पथकाला शिवीगाळ व धमकी दिली. वन विभागाने ट्रकसह लाकूड जप्त केले. ट्रक पुढील कारवाईसाठी लाकूड आगारात आणत असताना आरोपीने आर्वी मार्गावर थांबवत त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. वन विभागाने पोलिस स्टेशनला तक्रार दिली. ही घटना १६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. तळेगाव पोलिसांनी तक्रारीवरून रात्री गुन्हा नोंद केला.
मौजा वर्धमनेरी परिसरातील नायरा पेट्रोल पंपापासून १०० मीटर अंतरावर कालव्याच्या रस्त्याने तळेगावकडून आर्वीकडे अवैध लाकूड घेऊन जाणारा ट्रक येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या मार्गावर पोहोचले असता त्यांना एम.एच. ०४ यू.एल. ७९५२ क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरीत्या आढळून आला. वन विभागाच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विविध जातींचे लाकडं असल्याचे दिसुन आले. वन कर्मचार्यांनी चालकाकडे लाकूड वाहतुकीचा परवाना तसेच आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांकडे आवश्यक परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर वन विभागाने ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करताच ट्रक चालकाने कारवाईला विरोध करीत शिवीगाळ केली. वन विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणत ट्रक पुढील कारवाईसाठी तळेगावकडे कार्यालयात घेऊन जात असताना ट्रक अर्ध्या रस्त्यात अडवून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. घटनेची माहिती तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अजय लांबाडे यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मुल्कसिंग भगतसिंग बावरी, अखालसिंग बावरी, जसबीरसिंग मुल्कसिंग बावरी, रोहितसिंग मुल्कसिंग बावरी, कुलदीपसिंग अखालसिंग बावरी, सुमितसिंग मुल्कसिंग बावरी व लकिसिंग वतनसिंग टाक सर्व रा. शिवखेडा, काकडदरा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ठाणेदार मंगेश भोयर व वनपरिक्षेत्र अधिकारी गजय लांबाडे पुढील तपास करीत आहे.