नवी दिल्ली,
Garba partners available for rent नवरात्री जवळ येताच गरबा आणि दांडियाचा उत्साह वाढला आहे. मात्र, गरबा खेळण्याची इच्छा असूनही सोबत नाचण्यासाठी पार्टनर नसलेल्या मंडळींसाठी सोशल मीडियावर आलेली एक भन्नाट पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये थेट ‘गरबा पार्टनर भाड्याने घ्या’ अशी संकल्पना मांडण्यात आली असून, त्यासाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम अशी तीन पॅकेजेस देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये केवळ गरबा नृत्यच नाही, तर मॅचिंग पोशाख, छायाचित्रे, रील्स आणि घरी सोडण्यासारख्या सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.पोस्टनुसार, सिल्व्हर पॅकेजची किंमत ₹१,००० असून त्यात दोन तासांचा गरबा, मॅचिंग पोशाख, गरब्याच्या मूलभूत स्टेप्स शिकवणे आणि सेल्फीचा समावेश आहे. गोल्ड पॅकेजसाठी ₹१,५०० मोजावे लागतील. यात चार तासांचा गरबा, मॅचिंग पोशाख, रील्स आणि इंस्टाग्रामसाठी फोटो मिळणार आहेत. एवढेच नाही तर या पॅकेजमध्ये पार्टनरच्या मित्रांना ‘भाई’ आणि ‘भाभी’ म्हणण्याचा पर्यायही दिल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेले प्लॅटिनम पॅकेज ₹२,०००चे आहे. यामध्ये पूर्ण दिवस गरबा, नृत्याच्या स्टेप्स, दुपट्टा आणि कानातले सांभाळण्याची जबाबदारी तसेच गरबा संपल्यानंतर सुरक्षितपणे घरी सोडण्याची सोय असल्याचे सांगण्यात आले आहे. पोस्ट सोशल मीडियावर पोहोचताच वापरकर्त्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने ‘गरबा सिल्व्हरमध्ये, नातं गोल्डमध्ये आणि लग्न प्लॅटिनममध्ये’ अशी मिश्कील टिप्पणी केली, तर दुसऱ्याने पूर्ण दिवसासाठी ₹२,००० हीच खरी ऑफर असल्याचे म्हटले. काही जणांनी गरब्याच्या स्टेप्स शिकण्यासाठी फक्त पार्टनरची गरज असल्याचे सांगत मोफत पर्यायाबाबतही गंमतीने विचारणा केली. तर काहींनी या पॅकेजमध्ये जेवणाचाही समावेश करण्याची मागणी केली. अविवाहितांसाठी नवरात्रीतील विशेष योजना असल्याच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. त्यामुळे गरबा पार्टनर भाड्याने घेण्याची ही मजेशीर पोस्ट नवरात्रीपूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.