पवनकुमार लढ्ढा
चिखली,
Gaurai has arrived भाद्रपद महिना म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा सुवर्णकाळ. हरितालिका, पाठोपाठ लाडक्या गणरायाचे आगमन आणि त्यानंतर लगबग सुरू होते ती साऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सणाची... अर्थात माहेरवाशीण गौराईच्या आगमनाची! गणरायाच्या अस्तित्वाने घराघरात जे मांगल्य आणि चैतन्य निर्माण झालेले असते, त्याला गौराईच्या आगमनाने एक भावनिक किनार लाभते. कारण गौरी म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर ते एका लेकीचं, सासुरवाशिणीचं आपल्या लाडक्या माहेरी येणं आहे. भारतीय संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रात लेकीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 'गौरी आल्या.. कशाच्या पायी? सोन्या चांदीच्या पायी..' असा गजर करत, उंबरठ्यापासून देव्हाऱ्यापर्यंत हळदी-कुंकवाची पावले रेखाटत जेव्हा या माहेरवाशिणीचे घरात स्वागत होते, तेव्हा प्रत्येक घरातील वातावरण भक्ती आणि वात्सल्याने भारावून जाते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन रूपात येणाऱ्या या साक्षात संपत्तीच्या देवता आहेत, अशी आपली धारणा आहे. म्हणूनच, माहेरी आलेल्या लेकीचे जसे लाड पुरवले जातात, तिचे कोडकौतुक केले जाते, अगदी तसाच पाहुणचार या तीन दिवसांत गौराईचा केला जातो.
काळ बदलला, जगण्याची गती वाढली, तरीही या सणाचा मूळ गाभा आणि त्यामागची भावना तसूभरही बदललेली नाही, हे विशेष. आजही चिखलीसारख्या अनेक भागात उभ्या गौरी बसवण्याची पारंपरिक प्रथा तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. नवीन खण-साडी, पैंजण, नथ, बोरमाळ, ठुशी आणि राणीहारासारख्या पारंपरिक दागिन्यांनी गौराईला सजवताना प्रत्येक गृहिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळते. या उत्सवाचे आणखी एक विलोभनीय रूप म्हणजे गौरीच्या निमित्ताने घराघरांत साकारले जाणारे कल्पक देखावे. केवळ मखर आणि फुलांची सजावट न करता, आजकाल चिखलीतील अनेक घरांमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक देखावे अतिशय सुंदररीत्या उभारले जातात. पौराणिक प्रसंग, संत परंपरा यांच्या सादरीकरणासोबतच स्त्री-भ्रूणहत्या, बेटी बचाओ, साक्षरता किंवा शेतकरी जीवन अशा अनेक ज्वलंत सामाजिक विषयांवर या देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन केले जाते. सर्वांत महत्त्वाची आणि स्वागतार्ह बाब म्हणजे, या सजावटीत आता दिसू लागलेला पर्यावरणपूरक दृष्टिकोन. थर्माकोल किंवा प्लास्टिकला फाटा देत, हल्ली महिला कापडी, इको-फ्रेंडली मखरांना आणि घरच्या घरी केलेल्या नैसर्गिक सजावटीला पसंती देत आहेत. मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारा आणि पर्यावरणाचे भान राखणारा हा कल समाजाची प्रगल्भता दर्शवतो.
या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील पाककला आणि नैवेद्याची विविधता. पहिल्या दिवशी माहेरवाशिणीला दिला जाणारा बाजरीची भाकरी आणि मेथीच्या भाजीचा साधा पण चविष्ट नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी १६ वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि पंचपक्वान्नांचा दाखवला जाणारा नैवेद्य दाखवतात, हे आपल्या कृषी आणि आहार संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. दिवाळीसारखा फराळ आणि आप्तेष्टांसोबत केली जाणारी पंगतीची सांगता, हा या सणाचा सामाजिक धागा अधिक घट्ट करतो. रोजगारासाठी शहरात गेलेला चाकरमानी या निमित्ताने गावाकडे वळतो आणि घराघरात पुन्हा एकदा एकत्र कुटुंबाचा सोहळा रंगतो. थोडक्यात सांगायचे तर, गौराईचे हे तीन दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा, मायेचा, नात्यांचा आणि प्रबोधनाचा उत्सव आहे. या माहेरवाशिणीच्या आगमनाने घराघरात आलेली समृद्धी, नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा वर्षभर अशीच टिकून राहो, हीच सदिच्छा