मोदींच्या हस्ते ‘सेमीकॉन इंडिया २०२६’चे उद्घाटन

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Inauguration of Semicon India 2026 भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला जागतिक पातळीवर बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ या तीन दिवसीय परिषदेला गुरुवारी सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील यशोभूमी येथे या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. १७ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाची यंदाची संकल्पना ‘सिलिकॉन टू सिस्टीम्स: बिल्डिंग द इकोसिस्टम’ अशी आहे. यावेळी भारत विकासाच्या मार्गावर असून ब्रिक्समध्येही देशाची ताकद दिसून येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जागतिक तसेच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, नवउद्योजक, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत. भारतासह एकूण ५२ देशांतील कंपन्यांचा या उपक्रमात सहभाग आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स रचना आणि उत्पादन परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणारी जागतिक उद्योग संघटना ‘सेमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
semilom
 
यशोभूमीतील १५ हजार चौरस मीटरच्या प्रदर्शन क्षेत्रात ६०० हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले असून, त्यात सुमारे ३०० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विविध घडामोडी, संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी १५० हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात सहा देश आणि १२ राज्य सरकारांची स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमात नवउद्योजक, नवकल्पना, विद्यार्थी, मनुष्यबळ विकास आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील महिलांसाठीही विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवउद्योजकांच्या दालनात सुमारे ४० नवउद्योजक त्यांच्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कौशल्य, प्रतिभा आणि रोजगाराच्या संधींवर मनुष्यबळ विकास दालनात भर दिला जाणार आहे. नवउद्योजकांच्या कल्पनांना आणि विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याला चालना देण्यासाठी नवउद्योजक सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थी हॅकाथॉन आणि नवकल्पना प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.