छत्तीसगड
jhiram ghati attack verdict छत्तीसगडमधील गाजलेल्या झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूर येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहा दोषी नक्षलवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. 16 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी न्यायालयाने 2013 मध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याप्रकरणी दहा आरोपींना दोषी ठरवले होते; मात्र शिक्षेचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
झीरम घाटी येथे 25 मे 2013 रोजी काँग्रेसच्या ‘परिवर्तन यात्रे’वर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. सुकमा जिल्ह्यातील दरभा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हल्ला झाला. तपासादरम्यान या कारवाईत 200 हून अधिक नक्षलवादी सहभागी असल्याचे समोर आले होते. काँग्रेस नेत्यांचा ताफा झीरम घाटीतून जात असताना नक्षलवाद्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले. ताफा थांबवण्यासाठी पुढील वाहनाजवळ भूसुरुंगाचा स्फोट करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला.
या हल्ल्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सुरक्षा दलातील जवान मिळून एकूण 29 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. देशातील नक्षलवादी हिंसाचारातील अत्यंत भीषण घटनांमध्ये या हल्ल्याची गणना केली जाते. याच प्रकरणात आता एनआयएच्या विशेष न्यायालयाने दहा दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषींना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, मृत्युदंडाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असते. या प्रकरणात 25 सप्टेंबर 2014 रोजी अटक करण्यात आलेल्या 11 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रात एकूण 28 आरोपींची नावे होती. त्यापैकी अनेक जण अद्याप फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या आरोपींपैकी काही मोठ्या नक्षली कमांडरांनी गेल्या काही महिन्यांत सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पणही केले आहे.
या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या jhiram ghati attack verdict नक्षलवाद्यांमध्ये प्रमिला मोडियाम, चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना, सुमिता ऊर्फ पुनेम मोडियाम, मुक्का मंडावी, कोसा कवासी ऊर्फ कोसराम, आयता मरकाम, मडकामी देवा, जोगा मडकामी, बंजामी सन्ना ऊर्फ चम्रू आणि महादेव नाग यांचा समावेश आहे.झीरम घाटी हल्ल्यात छत्तीसगड काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचाही मृत्यू झाला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलवा जुडूम मोहिमेच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावणारे महेंद्र कर्मा हेही या हल्ल्यात मारले गेले. माजी केंद्रीय मंत्री आणि छत्तीसगडमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र काही दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उदय मुदलियार तसेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मुलगा दिनेश पटेल यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
या हल्ल्यावेळी काँग्रेसचे कोंटा मतदारसंघाचे आमदार असलेले कवासी लखमा हेही परिवर्तन यात्रेच्या ताफ्यात सहभागी होते. 1998 पासून ते कोंटा मतदारसंघाचे आमदार होते. नक्षलवाद्यांनी ताफ्यावर हल्ला केल्यानंतर लखमा यांचा जीव वाचला. ते ज्या वाहनात होते, त्या वाहनातील इतर काही जण ठार झाले असतानाही ते बचावले. या घटनेनंतर त्यांच्या भूमिकेबाबत काही जणांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, झीरम घाटी हल्ल्याच्या प्रकरणातील न्यायालयीन कारवाईत आता दहा दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.