चंद्रपूर,
Low rainfall in Chandrapur district चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे दुष्काळसद्दष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला आलेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने या जिल्ह्याकडे वक्रद्दष्टी टाकली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 13 सप्टेंबरपर्यंत 41.57 टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडली आहेतच. शिवाय पूढे येणार्या रब्बी पिकांबाबतही शेतकरी चिंतेत आहे. मागील वर्षी 13 सप्टेंबरपर्यंत 1105.60 मिमी पाऊस पडला होता. तो आकडा तर यंदा गाठता आलाच नाही.
उलट याच कालावधीत यंदा सरासरी 645.90 मिलीमिटरच पाऊस झाला. अपुर्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था गंभीर असून, जिल्ह्यातील मुख्य पिके कापूस, सोयाबीन, धानावर संकट आले आहे. विहिरी व स्थानिक जलाशयांतील पाणीपातळीही खालावली आहे. जुलै अखेरीस जिल्ह्यात काही तालुक्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राजुरा, बल्लारपूर, गोंडपिपरी, चंद्रपूर, कोरपना व भद्रावती तालुक्यात कापुस 11 हजार 660 हेक्टर, सोयाबीन 508, तूर 348, भात 169, भाजीपाला 42, तर इतर पिके 6.10 हेक्टर तसेच केळी व पपई 1.25 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. एकूण 126 गावात 10 हजार 795 शेतकर्यांचे 12 हजार 735 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसेच राजुरा व पोंभुर्णा तालुक्यातील 83 शेतकर्यांचे 28.67 हेक्टर शेतातील पिंकाचे नुकसान झाले आहे. यंदा पावसामध्ये अनियमितता व खंड पडत पडल्यामुळे पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होत असून, सर्व पिकांच्या उत्पादकतेवर 15 ते 20 टक्के घट होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा कृषी अधिकारी तोतावर यांनी दिली. त्याचप्रमाणे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने अनेक भागातील पिके वाहून गेले. त्याचे पंचनामे पूर्ण झाले असून, निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील धरणांत 69 टक्केच जलसाठा
चंद्रपूर जिल्ह्यात 2 मोठे, 8 मध्यम व 88 लघु प्रकल्प असून एकंदरित प्रकल्पीय संकल्पित जलसाठा 443.157 दशलक्ष घन मिटर असून, सद्यस्थितीत 305.799 दल.घ.मि. म्हणजे, 69टक्के जलसाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात मागील वर्षी या सर्व प्रकल्पांचा जलसाठा 13 सप्टेंबर 2026 अखेर 100 टक्के होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात 31 टक्केची तूट असल्याचे दिसून येते.