मोहम्मद रिजवानला मोठा धक्का!

लाहोर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Major setback for Mohammad Rizwan पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान याला लाहोर उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे तपास यंत्रणेने म्हणजेच एनसीसीआयएने रिजवान आणि सलामीवीर इमाम-उल-हक यांना बजावलेल्या नोटिसांविरोधात रिजवानने न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर मुख्य न्यायाधीश आलिया नीलम यांनी ही याचिका फेटाळून लावली. रिजवानच्या वतीने काझी उमैर अली यांनी न्यायालयात बाजू मांडली. लॉर्ड्स कसोटीनंतर रिजवानला कोणतीही पूर्वसूचना न देता हॉटेलच्या लॉबीमध्ये बोलावण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. 
 
 
qw234253456546
यावेळी त्याचा मोबाइल फोनही ताब्यात घेण्यात आला. तीन तासांनंतर फोन परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र तो परत करण्यात आला नसल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर मुख्य न्यायाधीश आलिया नीलम यांनी नोटिसांना उत्तर देण्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले आणि नोटिसा नेमक्या कोणत्या तारखेला बजावण्यात आल्या, अशी विचारणाही केली. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचा सहभाग असायला हवा होता, असा युक्तिवाद रिजवानच्या वकिलांनी केला. तसेच हे प्रकरण राष्ट्रीय सायबर गुन्हे तपास यंत्रणेच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचा दावा करत नोटिसांच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान, एनसीसीआयएकडून रिजवान आणि इमाम-उल-हक यांच्या मोबाइलची न्यायवैद्यक तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.तपास यंत्रणा पुढील आठवड्यापर्यंत आपला अहवाल पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे सादर करण्याची शक्यता आहे.
अहवाल आल्यानंतर दोन्ही खेळाडूंना दिलासा द्यायचा की त्यांच्याविरोधात पुढील कारवाई करायची, याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट मंडळ घेणार आहे. तपासात सर्व काही सामान्य आढळल्यास रिजवान आणि इमाम यांना दिलासा मिळू शकतो. पाकिस्तानने नुकताच इंग्लंडचा दौरा केला होता. या मालिकेत पाकिस्तानला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानने सात खेळाडूंना संघातून बाहेर केले होते. त्यात मोहम्मद रिजवान आणि इमाम-उल-हक यांचाही समावेश होता. दोघांना तातडीने पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रीय सायबर गुन्हे तपास यंत्रणेने त्यांच्याविरोधात तपास सुरू करत चौकशीसाठी नोटिसा बजावल्या.