मुंबई
marathwada history भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळण्यासाठी आणखी एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग झाला. म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्या काळात तत्कालीन भारतात ३५० हून अधिक संस्थाने होती. हैदराबाद संस्थान त्यापैकी एक होते आणि आजचा मराठवाडा हा त्याच संस्थानाचा भाग होता.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली आणि त्यावेळी मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या प्रदेशाच्या पूर्वेला विदर्भ, पश्चिमेला पश्चिम महाराष्ट्र, उत्तरेला खान्देश, तर दक्षिणेला तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये आहेत. सुमारे ६४ हजार ५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या मराठवाड्यात आठ जिल्हे आणि ७६ तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर हे या विभागाचे प्रशासकीय केंद्र असून, पूर्वी या शहराला औरंगाबाद म्हणून ओळखले जात होते.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. नाशिक जिल्ह्यात उगम पावणारी गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांतून वाहत पुढे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्रवेश करते आणि अखेरीस बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यामुळे गोदावरीला मराठवाड्याची ‘गंगा’ मानले जाते आणि तिच्या खोऱ्यामुळे हा प्रदेश ‘गंगथडी’ म्हणूनही ओळखला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचीही या प्रदेशाच्या जलव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. हे धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्याची ओळख अत्यंत समृद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ लेणी जगप्रसिद्ध असून, त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. जगातील १७३ देशांमधील १,२७३ वारसास्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली असून, त्यामध्ये अजिंठा आणि वेरूळचाही समावेश आहे. वेरूळमधील बुद्ध लेणी आणि कैलास मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेचे अद्भुत नमुने मानले जातात. कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी, ‘दख्खनचा ताजमहाल’ म्हणून ओळखले जाणारे बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबादचा किल्ला, अंतुरचा किल्ला, शुलीभंजनचा किल्ला आणि वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर यामुळे या भागाच्या ऐतिहासिक वारशात मोठी भर पडते.
नांदेडचे धार्मिक महत्त्वही देशाच्याmarathwada history नकाशावर वेगळे आहे. शीख धर्माचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंह यांची समाधी असलेले हुजूर साहिब गुरुद्वारा हे शीख धर्मातील देशभरातील पाच प्रमुख पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. खुल्ताबाद परिसराचा इतिहास सूफी संतांच्या वास्तव्याशी जोडलेला आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांची अनेक धार्मिक स्थळे मराठवाड्यात आढळतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे.
मराठवाड्याला संतांचीmarathwada history भूमी म्हणूनही ओळखले जाते. पैठणजवळील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला, तर संत एकनाथांचे जन्मस्थान पैठण आहे. गंगाखेडमध्ये जन्मलेल्या संत जनाबाई आणि अंबाजोगाईचे संत मुकुंदराज यांनी मराठी संतपरंपरेत महत्त्वाचे योगदान दिले. मुकुंदराजांना मराठीतील आद्यकवी मानले जाते. हिंगोली जिल्ह्यात जन्मलेल्या संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतापर्यंत नेली. त्यांच्या अभंगांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे.
मराठवाड्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशीही जोडलेला आहे. शिवाजी महाराजांचे प्रमुख कार्यक्षेत्र पुणे आणि कोकण परिसरात असले तरी त्यांच्या वडिलांचे मूळ गाव वेरूळ होते. वेरूळ येथे आजही शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.
छत्रपती संभाजीनगर शहराची ओळखही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी वेगळी आहे. शहरात असलेल्या ऐतिहासिक दरवाजांमुळे ते ‘५२ दरवाजांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी ओळखही या शहराला मिळाली आहे. औद्योगिक क्षेत्रातही छत्रपती संभाजीनगरने स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, आशिया खंडातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांमध्ये त्याचा समावेश केला जातो.
जालना शहरावर पाणीटंचाईचा ठपका असला तरी उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात त्याची स्वतंत्र ओळख आहे. बियाणांची राजधानी, स्टील उद्योगाचे केंद्र आणि मराठवाड्यातील आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून जालन्याची ओळख आहे. लातूरच्या बाजारपेठेलाही कृषी व्यापारात महत्त्वाचे स्थान असून, येथील मार्केट यार्डमधून देशभरातील तेलाचे, विशेषतः सोयाबीन तेलाचे दर ठरवले जातात.
शिक्षणाच्या क्षेत्रातही मराठवाड्याच्या वाटचालीत महत्त्वाचे टप्पे आले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी पुणे किंवा हैदराबाद गाठावे लागत असे. १९५० मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. केवळ मराठवाडाच नव्हे, तर विदर्भातील बुलढाणा, खान्देशातील जळगाव आणि धुळे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही उच्च शिक्षणाची संधी सुलभ झाली.
पुढे या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोठा संघर्ष उभा राहिला. तब्बल १६ वर्षांच्या आंदोलनानंतर विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला. मुंबईनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठवाड्याशी विशेष नाते होते, ही बाबही या प्रदेशाच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाची मानली जाते.
मराठवाड्याची खाद्यसंस्कृतीदेखील या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांमध्ये भर घालते. ज्वारी, बाजरी, गहू आणि हरभरा ही येथील प्रमुख पिके आहेत. गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत झणझणीत पिठले, भाजणीचे धपाटे आणि दही हा मराठवाड्यातील पारंपरिक आहाराचा अविभाज्य भाग आहे. आठही जिल्ह्यांत वेगवेगळ्या पद्धतींच्या चटण्यांची परंपरा आढळते.
मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा ‘नान खलिया’ विशेष प्रसिद्ध आहे. झणझणीत काळा रस्सा हा येथील मांसाहारी जेवणाची खासियत मानली जाते. काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी, नांदेडची खिचडी, गंगापूरचा ज्वारीचा हुरडा, छत्रपती संभाजीनगरमधील तारा पान सेंटरचे ‘तारा पान’ तसेच धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा पेढा आणि खवा यांना विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. कुंथलगिरीच्या खवा आणि पेढ्याला केंद्र सरकारकडून भौगोलिक संकेतांक अर्थात GI टॅगही मिळाला आहे.
राजकीयदृष्ट्याही मराठवाड्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. या प्रदेशातून अनेक नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भूषविले. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.
राष्ट्रीय राजकारणातही मराठवाड्याचे योगदान मोठे राहिले आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंजाबच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली, तर हरीभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी आहेत. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सूर्यकांता पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील यांनी केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे.
सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या दृष्टीने मराठवाड्याकडे अनेकदा प्रयोगभूमी म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे विविध राजकीय आणि सामाजिक प्रयोग या भूमीत झाले आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून संतपरंपरा, ऐतिहासिक वारसा, धार्मिक विविधता, शिक्षण, उद्योग, कृषी, खाद्यसंस्कृती आणि राजकारणापर्यंत मराठवाड्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. १७ सप्टेंबरचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा त्यामुळे केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस न राहता, या समृद्ध आणि बहुआयामी प्रदेशाच्या ऐतिहासिक वाटचालीची आठवण करून देणारा दिवस ठरतो.