मेलबर्न,
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने बिग बॅश लीगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०२४ टी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या ३८ वर्षीय वेडने आता पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघासोबत तो फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मॅथ्यू वेड यापूर्वी बीबीएलमध्ये खेळतानाच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघासोबत सल्लागार म्हणूनही कार्यरत होता. आता बीबीएलमधील कारकीर्द संपवत तो लवकरच ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी वेडने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारांत एकूण २२७ सामने खेळले असून, त्याच्या नावावर ४६८२ धावा आहेत.

बिग बॅश लीगमधील ११९ सामन्यांच्या कारकीर्दीत वेडने मेलबर्न स्टार्स, मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले. २०११ ते २०२६ या कालावधीत तो बीबीएलमध्ये खेळला असून, मागील ९ हंगामांपासून तो होबार्ट हरिकेन्सशी जोडलेला होता. बीबीएल कारकीर्दीत त्याने २९७८ धावा केल्या. यात एका शतकासह १९ अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने ७० फलंदाजांना बाद करण्यात योगदान दिले. बीबीएलच्या २०२५-२६ हंगामात वेडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने ११ सामन्यांत केवळ १६१ धावा केल्या आणि एकही अर्धशतक झळकावले नाही. मात्र, होबार्ट हरिकेन्ससोबत त्याने महत्त्वाची कारकीर्द घडवली असून २०२४-२५ हंगामात संघाला बीबीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याच्या संस्मरणीय क्षणांपैकी एक २०२१ टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाहायला मिळाला. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार ठोकत वेडने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. या पराभवामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता.