मानोरा,
Pohradevi बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी परिसरात प्रस्तावित नवीन विमानतळाच्या अनुषंगाने राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांची मुंबई मंत्रालयात बुधवार, १६ सप्टेंबर रोजी विधान परिषदेचे आमदार महंत बाबूसिंग महाराज आणि उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी विमानतळाच्या प्रस्तावासंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. पोहरादेवीच्या धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, तसेच प्रस्तावित विमानतळाला लवकर प्रशासकीय मंजुरी मिळावी, यासाठी आवश्यक त्या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. अति महत्त्वाच्या व्यक्तींना हेलिकॉप्टर द्वारे तालुयात येता यावे यासाठी आधीच पोहरादेवी येथे अद्यावत हेलिपॅड ची निर्मिती काही वर्षांपूर्वी शासनाकडून करण्यात आलेली आहे. विमानतळ निर्मितीच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीमुळे पोहरादेवी येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामाला आगामी काळात सुरुवात होण्याबाबतच्या आशा उंचावल्या असून, आता शासनाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.