मुंबई
tigress bijli मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या ‘बिजली’ अर्थात T2 या वाघिणीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावत होती. रात्री सुमारे 9.45 वाजता बिजलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ती 18 वर्षे 4 महिन्यांची होती. तिच्या निधनाने राष्ट्रीय उद्यान प्रशासन तसेच वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या महिनाभरापासून बिजलीच्या आहाराचे प्रमाण सातत्याने कमी झाले होते. त्यामुळे तिच्यावर विशेष वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील तांत्रिक पशुवैद्यकीय सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार करण्यात येत होते. तिची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांच्या पथकाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. तिला वैद्यकीय उपचारांसोबतच आवश्यक सहाय्यक सेवाही पुरविण्यात आल्या. मात्र, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, वृद्धापकाळामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे बिजलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण निश्चित करण्यासाठी नियमानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृत्यूमागील वैद्यकीय कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बिजलीला 11 जुलै 2016 रोजी नागपूरजवळील पेंच व्याघ्र प्रकल्पातून मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्यानंतर दहा वर्षांहून अधिक काळ ती उद्यानात वास्तव्यास होती. या कालावधीत काळजीवाहू आणि पशुवैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तिची निगा राखण्यात आली. तिचा शांत स्वभाव आणि आकर्षक वावर यामुळे ती उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी कायमच कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय राहिली होती. त्यामुळे उद्यानातील कर्मचारी आणि देखभाल करणाऱ्या पथकासाठीही बिजली विशेष जिव्हाळ्याची बनली होती.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दीर्घ वास्तव्यादरम्यान बिजलीने वन्यजीव संवर्धन, व्यवस्थापन आणि वन्यप्राण्यांविषयी जनजागृतीच्या कार्यात अप्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या माध्यमातून लाखो पर्यटकांना वन्यजीवांचे दर्शन घेण्याची आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली.बिजलीच्या निधनाने उद्यानातील वन्यजीवविश्वातील एक परिचित आणि लोकप्रिय सदस्य हरपला आहे. तिच्या दीर्घ वास्तव्याची आणि वन्यजीव संवर्धन व जनजागृतीतील योगदानाची दखल घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दुःख व्यक्त केले असून, बिजलीला भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.