बांगलादेशच्या कांदा अन् भारताचा वांदा!

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ndia in a tight spot in the onion market भारतातून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करणाऱ्या बांगलादेशने आता कांदा निर्यातीच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन वाढून अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्याने हा कांदा श्रीलंकेच्या बाजारपेठेत पाठवण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. त्यामुळे भारतीय कांदा निर्यातदारांसमोर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीर बांगलादेशचे एक शिष्टमंडळ नुकतेच श्रीलंकेला भेट देऊन गेले. श्रीलंकेतील स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून तेथे बांगलादेशी कांद्याला बाजारपेठ मिळू शकते का, याची चाचपणी करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून समोर आली आहे. २०२३-२४ मध्ये बांगलादेशने भारतातून जवळपास ४० टक्के कांदा आयात केला होता. भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या बांगलादेशने आता स्वतःच्या उत्पादनातून अतिरिक्त कांदा उपलब्ध झाल्यानंतर निर्यातीचा विचार सुरू केला आहे.
 
 

ndia in a tight spot in the onion market 
 
भारतीय कांदा निर्यातदारांच्या मते, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणातील वारंवार होणाऱ्या बदलांचा यावर परिणाम झाला आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात तब्बल ११ वेळा हस्तक्षेप केला. निर्यातबंदी आणि निर्यात शुल्कात करण्यात आलेले बदल यामुळे परदेशातील पारंपरिक बाजारपेठांमध्ये भारतीय कांद्याच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचा दावा निर्यातदारांकडून करण्यात येत आहे. बांगलादेशसारखा भारताचा पारंपरिक ग्राहक देश आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा निर्यातदार म्हणून उतरण्याच्या तयारीत असल्याने भारतीय कांदा व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. भविष्यात भारतीय कांद्यासाठी परदेशातील बाजारपेठेवर याचा काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात स्थैर्य आणण्याची आणि या विषयाकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.