मुंबई
preity zinta बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. आता ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटातून ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच प्रीती झिंटा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, अभिनेत्रीने स्वतःच या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रीतीने तिच्या एक्स हँडलवर ‘पीजेड चॅट’ या नावाने ‘आस्क मी’ सेशन आयोजित केले होते. या संवादादरम्यान चाहत्यांनी तिला चित्रपटासह विविध विषयांवर प्रश्न विचारले. राजकारणात प्रवेश करण्याबाबतही एका चाहत्याने तिला थेट प्रश्न केला.
“तुम्ही भविष्यात कधी स्वतःला राजकारणात सामील होताना पाहता का?” असा सवाल या युजरने प्रीतीला केला. भविष्यात राजकारणात जाण्याचा विचार आहे का, याबाबत विचारलेल्या या प्रश्नाला अभिनेत्रीने स्पष्ट उत्तर दिले.
“सध्या राजकारणात जाण्याचा कोणताही विचार नाही,” असे प्रीती झिंटाने सांगितले. तिच्या या उत्तरामुळे राजकारणात प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे.दरम्यान, प्रीती झिंटा ‘बंटवारा १९४७’मधून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकसोबतच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित विविध चर्चांना सध्या पुन्हा उधाण आले आहे.