पुणे
pune police recruitment scam पुणे पोलीस भरतीमध्ये बनावट कुराश प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवल्याचे प्रकरण आता राज्यव्यापी तपासाचा विषय बनले आहे. महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या कोल्हापूर कनेक्शननंतर ऋती धैर्यशील पुनगावकर आणि धैर्यशील संभाजीराव पुनगावकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचे हे जाळे राज्यातील विविध भागांपर्यंत पसरले असल्याचे तपासातून समोर येत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, 2016 ते 2026 या दहा वर्षांच्या कालावधीत एक हजारांहून अधिक संशयित बनावट क्रीडा प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचा संशय आहे. प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न झालेल्या व्यक्तींना खेळाडू म्हणून दाखवून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रांसाठी संबंधित उमेदवारांकडून 50 हजार रुपयांपासून तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पुणे पोलीस भरतीतील कागदपत्रांच्या तपासणीत या प्रकाराचा उलगडा झाला. बनावट कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलीस दलात 19 उमेदवारांनी नोकरी मिळवल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दहा उमेदवार प्रशिक्षणासाठीही गेले होते. यानंतर राज्यातील अन्य आस्थापनांमध्येही अशाच प्रकारे नोकरी मिळवल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 71 जणांची कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या सर्वांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
पुणे पोलीस भरतीतून उघडकीस आलेले हे प्रकरण केवळ 19 उमेदवारांपुरते मर्यादित नसल्याने पोलिसांनी तपासाचा विस्तार केला आहे. 2016 ते 2026 या कालावधीत वितरित झालेल्या एक हजारांहून अधिक संशयित प्रमाणपत्रांची माहिती तपासली जात आहे. त्यापैकी बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून प्रत्यक्षात किती जणांनी सरकारी किंवा अन्य आस्थापनांमध्ये नोकरी मिळवली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील पुनगावकर दाम्पत्याने मुख्य आरोपींना मदत करताना काही कागदपत्रे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. संबंधित अकॅडमीच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रांचे जाळे नेमके किती भागात आणि किती व्यक्तींपर्यंत पोहोचले, याचाही तपास केला जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके राज्यातील वेगवेगळ्या भागांत रवाना झाली आहेत. 71 जणांच्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या आणखी वाढते का, तसेच या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.