आरएसएस हल्ल्याचे आर्थिक धागेदोरे! चार राज्यांत ईडीचे छापे

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
RSS attack and ED raids झारखंडमधील रांची येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर जून २०२६ मध्ये झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई केली. ईडीच्या दिल्ली विभागातील पथकांनी दिल्ली, बिहार, झारखंड आणि कर्नाटक या चार राज्यांतील संबंधित ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून सुरू असलेल्या तपासाचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
sfde46
 
 
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू असून, त्याच प्रकरणाला आधार मानून ईडीने आर्थिक व्यवहारांच्या दिशेने चौकशी सुरू केली आहे. हल्ल्याशी संबंधित व्यक्ती किंवा नेटवर्कच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार अथवा निधीचा वापर झाला आहे का, याचा तपास ईडी करत आहे. चारही राज्यांतील संबंधित ठिकाणांवर कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपासले जात आहेत. निधीचा स्रोत, पैशांची देवाणघेवाण आणि त्याचा संभाव्य माग काढणे हा तपासाचा प्रमुख भाग आहे.
रांचीच्या चुटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवारणपूर परिसरात १६ आणि १७ जूनच्या मध्यरात्री आरएसएस कार्यालयाच्या दिशेने दोन पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. एका बॉम्बमुळे इमारतीच्या छतावर आग लागली, तर दुसरा प्रवेशद्वाराजवळ पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
या प्रकरणात सैफ अन्सारी आणि अमन अन्सारी यांना अटक करण्यात आली होती, तर त्यानंतर सायम सुजान यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद राष्ट्रीय तपास संस्थेनेही केली असून, अधिकृत नोंदीनुसार प्रकरण क्रमांक RC-01/2026/NIA/RNC अंतर्गत रांचीतील आरएसएस कार्यालयाच्या परिसराकडे अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याचा तपास सुरू आहे. ईडीची सध्याची शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि इतर सामग्रीच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे.