अनिल कांबळे
नागपूर,
Sales manager commits suicide प्लॉटच्या व्यवहारात ग्राहकाकडून अतिरिक्त १२ लाख रुपये डेव्हलपमेंट चार्ज मागण्यात आल्याच्या वादातून तणावात आलेल्या ५१ वर्षीय सेल्स मॅनेजरने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोराडी परिसरात घडली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी ‘साईनाथ रिॲलिटीज’चे संचालक अजय मेश्राम (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत सेल्स मॅनेजरचे नाव मारोती चिरकुटराव लांजेवार (५१) असून, त्यांच्या पत्नी रंजना मारोती लांजेवार (४२) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. लांजेवार हे २०२१ पासून लावा ढाब्याजवळ खडगाव रोडवरील साईनाथ रिॲलिटीजमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये लांजेवार यांनी कंपनी आणि ग्राहक शिवनाथ ठाकरे (५०) यांच्यात प्रार्थना नगरी-०१ येथील प्लॉटचा व्यवहार घडवून आणला होता. या प्लॉटची किंमत ३८ लाख रुपये ठरली होती. ही रक्कम पाच वर्षांत हप्त्याने भरण्याचे ठरले होते. तक्रारीनुसार, ग्राहकाने प्लॉटची ठरलेली संपूर्ण ३८ लाख रुपयांची रक्कम भरल्यानंतर कंपनी संचालक अजय मेश्राम यांनी आणखी १२ लाख रुपये डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली मागितल्याचा आरोप आहे. अतिरिक्त रक्कम दिल्याशिवाय प्लॉटची ग्राहकाच्या नावावर रजिस्ट्री केली जाणार नाही, असेही सांगण्यात आल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.
घरात गळफास घेऊन आत्महत्या
६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महादुला येथील मानवटकर लेआउटमधील धम्मकुटी बुद्धविहाराजवळील प्रभाग क्रमांक १२ मधील राहत्या घरी लांजेवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. लांजेवार यांनीच ग्राहकाला कंपनीकडे आणून हा व्यवहार घडवून आणला होता. त्यामुळे ग्राहकाला रजिस्ट्री न मिळाल्याने ते तणावात होते. या प्रकारामुळे ते नैराश्यात गेल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. पत्नीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अजय मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.