नागपूर,
silver-mahalakshmi-at-bhosla-palaceनागपूरच्या राजवैभवाला धार्मिक श्रद्धेची जोड देणारी २९८ वर्षांची परंपरा यंदाही सिनीयर भोसला पॅलेसमध्ये कायम राहणार आहे. भोसले राजघराण्याच्या काळापासून सुरू असलेल्या चांदीच्या महालक्ष्मीच्या पूजन सोहळ्याची यंदाही पारंपरिक पद्धतीने तयारी करण्यात आली आहे.
इसवी सन १७२८ पासून सुरू झालेल्या या परंपरेला २०२६ मध्ये २९८ वर्षे पूर्ण होत आहेत. जुन्या कलाकुसरीने आणि अलंकारांनी सजविलेल्या चांदीच्या महालक्ष्मीची स्थापना हा या सोहळ्याचा प्रमुख आकर्षणाचा भाग असतो. राजघराण्याच्या परंपरेनुसार पूजाविधी पार पाडत महालक्ष्मीची आराधना केली जाणार आहे.
नागपूरच्या इतिहासात भोसले राजघराण्याचे महत्त्वाचे स्थान असून, त्यांच्या काळापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन केले जात आहे. सिनीयर भोसला पॅलेसमधील महालक्ष्मी पूजन ही त्याच वारशाची एक महत्त्वपूर्ण कडी मानली जाते. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा ठरतो.
शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली चांदीची महालक्ष्मी आणि तिच्याशी निगडित पारंपरिक अलंकार भाविकांसह इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. पिढ्यान्पिढ्या जपण्यात आलेली ही परंपरा आधुनिक काळातही त्याच श्रद्धेने पुढे नेली जात आहे.
महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे मुख्य प्रवक्ता सारंग ढोक यांनी याबाबत माहिती दिली. १७२८ पासून सुरू असलेली ही परंपरा २९८ वर्षांनंतरही अखंडपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक वारसा आणि पारंपरिक धार्मिक विधींचे जतन करण्याचे कार्य पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.