मुंबई
NCMC एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केलेली नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)ची सक्ती आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे. एनसीएमसी प्रणालीवर अचानक वाढलेल्या ताणामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
1 सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने प्रवाशांनी एकाच वेळी डिजिटल प्रणालीचा वापर सुरू केला. परिणामी महामंडळाच्या सर्व्हरवर मोठा ताण आला आणि सेवा संथ झाल्याच्या तक्रारी वाढल्या. तिकीट काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काही ठिकाणी वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंगही घडल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या.
या पार्श्वभूमीवर पात्र प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळण्यात अडथळा येऊ नये, यासाठी सक्षम प्राधिकरणाने प्रचलित पद्धतीने तिकीट देण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सध्या एनसीएमसी कार्डच्या तांत्रिक अडचणींमुळे सवलतीपासून वंचित राहावे लागणार नाही.
महामंडळाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि आगार व्यवस्थापकांना सुधारित सूचनाही दिल्या आहेत. ज्या पात्र प्रवाशांकडे अद्याप एनसीएमसी कार्ड उपलब्ध नाही, त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरात तिकीट देण्यात येणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांना सवलतीचा लाभ कार्डच्या माध्यमातूनच घ्यावा लागणार आहे.
तांत्रिक कारणामुळे एखाद्या प्रवाशाचे एनसीएमसी कार्ड वाचले गेले नाही, तरी पात्र प्रवाशाला सवलतीचे तिकीट नाकारता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या सुधारित नियमांची चालक आणि वाहकांना तातडीने माहिती देऊन प्रवाशांची गैरसोय किंवा अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आगार पातळीवर देण्यात आले आहेत.
दरम्यान, एनसीएमसी कार्डशी संबंधित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने स्वतंत्र मदतव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. कार्ड रिचार्ज, ॲक्टिव्हेशन, टॉपअप तसेच कार्डवरील शिल्लक रक्कम तपासण्यासंदर्भातील अडचणींसाठी एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून 022 42022190 आणि 022 69787303 हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आतापर्यंत 1.11 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी या योजनेत नोंदणी केली आहे. डिजिटल तिकीट प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर करून व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
एनसीएमसी कार्डच्या सक्तीला NCMC मिळालेल्या या मुदतवाढीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीचा लाभ घेता येणार असल्याने या कालावधीत पात्र प्रवाशांना आपले एनसीएमसी कार्ड सक्रिय करून घेण्याची संधी मिळणार आहे.