छत्रपती संभाजीनगर,
Thunderstorm in Sambhajinagar मराठवाड्यात पावसाने महिनाभर दडी मारल्याने खरीप पिके वाळून जाण्याच्या संकटात असतानाच गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसासोबत वीजेने कहर केला. सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.दहिगाव परिसरात गुरुवारी वादळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतात काम करणाऱ्या पती-पत्नीने झोपडीत आसरा घेतला होता. याचवेळी झोपडीवर वीज कोसळली आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. या दुर्दैवी घटनेमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
दुसरी दुर्घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. येथे वीज पडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सलग दोन घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालना शहर आणि परिसरातही गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते आणि त्यानंतर सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. जालना तालुक्यासह अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्येही पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी शेतातील पिके करपण्यास सुरुवात झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.