धान उत्पादक शेतकर्‍यांचा भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’

300 च्यावर ट्रॅक्टर व दुचाकी वाहनासह सहभागी धान बोनस, 24 तास वीजपुरवठ्यासह विविध मागण्या

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नागभीड, 
Tractor rally by paddy-growing farmers धान उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी तळोधी (बा.) येथील साई मंदिर ते नागभीड तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले. शेतकर्‍यांच्या मागण्यांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. नागभीड येथील राम मंदिर चौकातील रस्त्यावर धरणे देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
 
 
465
 
 
बोनस रखडल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन थकीत बोनसाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत असून, पिकांना पाणी देताना शेतकर्‍यांना अडचणी येत त्यामुळे शेतीसाठी 24 तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, यासोबतच सिंचनाच्या सुविधा उपलब्ध कराव्या , 4 हजार रुपयेपर्यंत धानाला हमी भाव द्यावा, शेतकर्‍यांना कृषी विद्युत जोउणी तातडीने उपलब्ध करून द्यावी, तसेच प्रलंबित वीज जोडण्या लवकरात लवकर मंजूर करून प्रत्यक्ष जोडणी देण्यात यावी बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे, पंप व इतर कृषी साहित्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणून शेतकर्‍यांना परवडणार्‍या दरात साहित्य उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश देशमुख यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नागभीड नगराध्यक्ष स्मिता खापर्डे, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे, धनंजय बोरकर, गिरीश नवघडे आदी उपस्थित होते.