उधमपूर,
Two terrorists eliminated in Udhampur जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ब्रत्तल परिसरात १६ आणि १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. 'ऑपरेशन सोहन' अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्तचर माहितीचा आधार घेण्यात आला. रात्रीची वेळ, खराब हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे कारवाईदरम्यान सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, व्हाईट नाईट कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे लक्ष्यित कारवाई केली. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती असून, त्यात दोन दहशतवादी ठार झाले. शोधमोहीमेदरम्यान शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख तसेच ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. कारवाईनंतरही ब्रत्तल परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम आणि पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. परिसरात आणखी कोणता धोका किंवा दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा तपास सुरक्षा दलांकडून केला जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये १५ दहशतवादी हल्ले झाले आहेत. या घटनांमध्ये १५ दहशतवादी ठार झाले असून, दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत. याशिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.