पिस्तूलसह फिरणाऱ्या युपीतील युवकाला अटक

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

nagpur उत्तर प्रदेशातून पिस्तूल घेऊन नागपुरात आलेल्या २३ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री अटक केली. हुक्का पार्लरमध्ये काम करणारा हा तरुण दारूच्या नशेत कमरेला बंदूक खोचून फिरत होता. त्याच्याकडून पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, हे शस्त्र उत्तरप्रदेशातून नागपुरात विक्रीसाठी आणले होते का?, याचा तपास सुरू आहे. अमन त्रिवेणीप्रसाद गुप्ता (रा.२३, रा. भैरवगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

 nagpur 
१६ सप्टेंबरच्या मध्यरात्री गुन्हे शाखेचे पथक गिट्टीखदान परिसरात गस्त घालत होते. पहाटे एक वाजताचे सुमारास रामदेवबाबा टेकडीमागील योगेंद्रनगरातील रस्त्यावर एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी अमन गुप्ताला ताब्यात घेतले.
अंगझडती दरम्यान त्याच्याकडे एक जिवंत काडतूस व कमरेला खोचलेले पिस्तूल आढळून आले. गुप्ता हा योगेंद्रनगरातील एका हुक्का पार्लरमध्ये काम करतो. त्याने उत्तरप्रदेशातून अग्निशस्त्र आणल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातून नागपुरात शस्त्र आणण्यामागे नेमका उद्देश काय होता, त्याने यापूर्वीही अशी शस्त्रे आणली आहेत का ?आणि त्याची येथे कुणाला चोरट्या मार्गाने विक्री केली का? त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा nagpur  दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी मुद्देमालासह गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक अढाऊ, अनुप यादव, नितीन राठोड व नितीन साळुंके यांनी केली