prime minister narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळचा म्हणजे १७ सप्टेंबरचा वाढदिवस विशेष म्हटला पाहिजे. यावर्षी ७ ऑक्टोबरला मोदी सरकार प्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी सलग १३ वर्षे काम केले, तर पंतप्रधान म्हणून त्यांना १२ वर्षेे पूर्ण झाली आहेत. सरकार प्रमुख म्हणून २५ वर्षांचा रौप्यमहोत्सवी कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी देशातील एकमेव पंतप्रधान आहेत. आजपर्यंत देशातील कोणत्याच नेत्याला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मिळून एवढा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
पंतप्रधान झालेले मोदी देशातील पहिले मुख्यमंत्री नाही, याआधी मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंह, चौधरी चरणसिंह आणि एच. डी. देवेगौडा यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पण, हे चौघेही फार काळ पंतप्रधान राहिले नाहीत. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विचार केला तर मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर पंडित जवाहरलाल नेहरू तर दुसऱ्या स्थानावर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी आहेत. मात्र, या दोघांनाही कधी मुख्यमंत्रिपद भूषवता आले नाही. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद एक तपापेक्षा जास्त काळ भूषविण्याचे भाग्य लाभलेले मोदी देशातील एकमेव तपस्वी नेते म्हटले पाहिजे.
प्रत्येक पंतप्रधान हा पहिल्यापेक्षा वेगळा असतो, त्याच्यातील नेतृत्वक्षमता, त्याची कार्यपद्धती आणि त्याची लोकप्रियता वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्यात तुलना करता येत नाही. नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी वगळता देशात अन्य कोणत्याही पंतप्रधानांना या चार नेत्यांएवढी लोकप्रियता लाभली नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर निर्विवाद मात केली आहे.
राजकीय क्षेत्रात मोदी यांनी एकापाठोपाठ जे विक्रम केले, ते आतापर्यंत कोणत्याच नेत्याला शक्य झाले नाही. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे, पण इंदिरा गांधींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेता आली नाही. तो विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. असा विक्रम करत मोदी यांनी पंडित नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. मोदी यांच्या राजकारणाचा झपाटा लक्षात घेता ते पंतप्रधान म्हणून आधी इंदिरा गांधी आणि नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा देशवासीयांना विश्वासच नाही तर खात्रीही आहे.
मोदी यांचे सर्व राजकारण जनतेला डोळ्यासमोर ठेवून केलेले म्हणजे लोककल्याणाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानाचे नाव ‘७ रेसकोर्स रोड’वरून ‘७ लोककल्याण मार्ग’ असे केले आहे. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीतून मोदी यांनी देशातील जनतेची नाडी पकडली आणि मन जिंकले आहे. जनतेच्या मनातील अनेक राष्ट्रीय स्वप्नांची पूर्तता मोदी यांनी केली आहे. देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना जे शक्य झाले नाही, ते मोदी यांनी करून दाखवले आहे. देशातील सर्वसामान्य जनता ज्या घोषणा देत होती, त्या जवळपास सर्व घोषणांची पूर्तता मोदी यांनी केली आहे. मग, ते स्वप्न जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० रद्द करण्याचे असो, महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे असो की, मुस्लिम महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध करून देणारा असो की, अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे असो, या सर्व राष्ट्रीय स्वप्नांची पूर्तता मोदी यांनी केली आहे. एकेकाळी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० निष्प्रभ होऊ शकेल, अयोध्येत राम मंदिर साकार होऊ शकेल, याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हते, या गोष्टी अशक्यप्राय वाटत होत्या. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे कवींचे माहात्म्य सांगणारे एक सुभाषित आहे, त्याच धर्तीवर, जे करण्याची हिंमत देशातील आतापर्यंतच्या एकाही राजकीय नेत्याला झाली नाही, त्या सर्व गोष्टी मोदी यांनी शब्दश: आणि चुटकीसरशी घडवून आणल्या. जादूगार आपल्या पेटाऱ्यातून एक-एक चमत्कार घडवतो, तसे अनेक चमत्कार मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात घडवले आहे.
मोदींसाठी अशक्य काहीच नाही. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. मोदींची राजकीय इच्छाशक्ती, दृढ निर्धार तसेच देशातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य जनतेबद्दलची आस्था हे मोदी यांच्या यशाचे गमक आहे. सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ अशी गर्जना केली होतील, ती त्यांनी बऱ्यापैकी साध्य केली आहे. भ्रष्टाचार संपवणे कोणालाच शक्य नाही, पण मोदी यांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणले आहे, तो बऱ्यापैकी कमी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे आज उजळमाथ्याने भ्रष्टाचार करणे कमी झाले आहे, आज भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण पकडले गेलो तर... अशी भीती वाटते, आपण पकडले गेलो तर आपल्याला कोणी वाचवणार नाही, अशी धास्ती त्यांच्या मनात सतत असते.
लाल किल्ल्यावरून सलग एक तप भाषण करणारे मोदी देशातील दुसरेच पंतप्रधान आहेत. लालकिल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी ज्या कल्पना मांडल्या, मग ती स्वच्छ भारताची असो, आत्मनिर्भर भारताची असो की गरीब कल्याणाची. या सर्व घोषणांची पूर्तता मोदी यांनी केली आहे.
मोदी यांची लोकप्रियता समाजाच्या सर्व वर्गांत आहे, लहान मुलांपासून विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वर्गात मोदी लोकप्रिय आहेत. आजपर्यंत देशातील कोणत्याही पंतप्रधानांच्या मनात ‘परीक्षा पे चर्चा’ घ्यावी अशी कल्पना आली नाही. मोदी यांच्या मनात ही कल्पना आल्यावर त्यांनी तातडीने ती कृतीत आणली. अभ्यास करताना आठवी, नववी आणि दहावीच्या मुलांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, मग या अडचणी शारीरिक असतील, मानसिक असतील वा व्यावहारिक असतील, त्याचे निराकरण मोदी यांनी केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे विशेष अभियान सुरू केले. देशाचा पंतपधान शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सहज रमतो, हे चित्र भारताने काय जगातील कोणत्याच देशाने अनुभवले नसेल.
मोदी दरवर्षी आपली दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करतात. २०१४ नंतरची मोदी यांनी आपली एकही दिवाळी पंतप्रधान निवासात साजरी केली नसेल. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची कल्पना आजपर्यंत देशातील एकाही पंतप्रधानाला एखादा अपवाद वगळता सुचली नसेल.
मोदी यांची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. मोदींच्या मनात विचार करताना, निर्णय घेताना प्रत्येक वेळी देशातील जनता केंद्रस्थानी असते. त्यामुळेच मोदींचे सर्व निर्णय हे धाडसी असले तरी लोकाभिमुख आणि कल्याणकारी असतात. त्यामुळेच मोदी देशहितासाठी तसेच देशातील जनतेच्या कल्याणासाठी काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळेच ‘मोदी है तो मुमकिन है’ असा विश्वास देशवासीयांच्या मनात निर्माण झाला आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतर देशातील राजकारणाचे चित्र आणि संस्कृती बदलली आहे. मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे जगात भारताची प्रतिमा बदलली आहे, भारताबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील अनेक देशांच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत, आपल्या अडचणीच्या परिस्थितीत भारत आपल्या मदतीला धावून येईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे हे यश म्हटले पाहिजे.
मोदी यांच्याबद्दल भारतातीलच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातील अनिवासी भारतीयांच्या मनातही विश्वास आहे, आपल्यावर काही संकट आले तर मोदी आपल्यासाठी धावून येतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. मोदी यांनी आपल्या कृतीने अनेकदा हा विश्वास सार्थ करून दाखवला आहे. त्यामुळेच मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, ही वाटचाल निर्णायक टप्प्यात पोहोचून भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि तसे झाले तर त्याचे निर्विवाद श्रेय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच राहणार आहे.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७