मासुलकसा जि. प. शाळेचा स्लॅब कोसळला

सुदैवाने मोठा अनर्थ टळला पालक व ग्रामस्थ आक्रमक

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
गोंदिया, 
Zilla Parishad school slab collapses देवरी पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या मासुलकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब अचानक खचल्याची घटना गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, इमारतीचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गाबाहेर झाडाखाली किंवा व्हर्‍हांड्यात शिक्षण घेत असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे जि. प. शाळांच्या दुरवस्थेचा आणि विद्याथ्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी शाळा सुरू असताना काही शिक्षक प्रशासकीय कामासाठी वर्गात बसले होते. त्याचवेळी अचानक वर्गखोलीच्या छताचा स्लॅब खाली कोसळला.
 

6u6789 
 
 
सुदैवाने शिक्षकांना दुखापत झाली नाही. मात्र, हाच स्लॅब नेहमीप्रमाणे विद्यार्थी आत बसलेले असताना कोसळला असता, तर मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागले असते, या कल्पनेनेच पालक आणि ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षक कार्यरत आहेत. इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची माहिती आणि तक्रारी यापूर्वीच संबंधित शिक्षण विभाग व पंचायत समितीकडे वारंवार करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनमुळे पालक व गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट असून प्रशासकीय आश्वासनांच्या कागदावरच आमच्या मुलांची सुरक्षितता अडकली आहे का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. मुलांच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत नवीन आणि सुरक्षित जागेची सोय होत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मासुलकसा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
...