स्मशानभूमीत अघोरी विधीचा धक्कादायक प्रकार

पाच जण पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अमरावती,
amravati news हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या मृतदेहाजवळ संशयास्पद पूजाविधी करून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पाच संशयितांना काही तासांत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 

amravati news alleged occult ritual at hindu cremation ground, five suspects detained 
याप्रकरणी निलेश मनोहरराव सोनटक्के (३४, रा. अमरावती), सुबोध प्रकाश भोयर (३०, रा. उदखेड, ता. जि. अमरावती), आशुतोष महादेव तायडे (३०, रा. अकोला), साहेबराव पांडुरंग गायकवाड (५६, रा. पुणे, सध्या ठाणे) आणि चंदु गणेशलाल गुप्ता (४३, रा. कुंभारपुरा, ब्राम्हणवाडा थडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
 
 
महेन्द्र राजू गवळी (वय २७) यांचा मृत्यू झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी दुपारी हिंदू स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मृताच्या मित्राने कुटुंबीयांना स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींनी पूजाविधी केल्याची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केली असता दफनस्थळाजवळ तंबाखू, अगरबत्त्या, माचिस, फुटाणे, अत्तराची छोटी बाटली आणि काळी टोपी आढळून आली. तसेच स्मशानभूमीजवळ लाल रंगाची हुंदाई एक्सेंट कार (क्र. एमएच ०३ सीएच २६६५) आढळली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संबंधित संशयितांचा शोध घेतला आणि काही तासांत त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४६१/२०२६ अन्वये महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ मधील कलम ३(१), ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रशांत जाधव व पथकाने केली.