सहरसामध्ये भाजप युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
सहरसा,
BJP leader murdered in Saharsa बिहारमधील सहरसा येथे भाजपशी संबंधित युवा नेता अभिजीत कुमार सिंह यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी १८ सप्टेंबर २०२६ रोजी गौतम नगर परिसरातील त्यांच्या घरातून मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांच्या कानशिलाजवळ गोळी लागल्याचे दिसून आले असून, पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून अभिजीत सिंह कार्यरत होते. त्यांचे वय २२ वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत सिंह बुधवारी रात्री एका कार्यक्रमाला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांच्या घरातच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी घरातून बराच वेळ कोणतीही हालचाल किंवा आवाज न आल्याने परिचितांना संशय आला. त्यांचा मित्र आर्यन याने अभिजीतच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
 
 
BJP leader murdered in Saharsa
 
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घरातील खोलीत अभिजीत यांचा मृतदेह आढळला. सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, न्यायवैद्यक पथकाने तपास केल्यानंतर कानशिलाजवळ गोळी लागल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडून हत्या झाल्याच्या दिशेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचीही तपासणी केली जात आहे.सहरसा सदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी घटनास्थळी पाहणी केली.
अभिजीत रात्री एका कार्यक्रमातून घरी परतले होते आणि त्यानंतर नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली, याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत शेवटचे ज्या मित्रांच्या संपर्कात होते, त्यांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. अभिजीत यांच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्यांचा धाकटा भाऊ दिल्लीत शिक्षण घेत असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांकडून हत्येमागील कारण आणि घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.