135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची छापेमारी

BMWसह कोट्यवधींची मालमत्ता जप्त

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
ed raids सुमारे 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ‘गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांशी संबंधित मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगरमधील सहा निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. या कारवाईदरम्यान कोट्यवधी रुपयांची BMW कार, महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय इंडियन बँकेच्या सिंगापूर शाखेत ठेवण्यात आलेली सुमारे 35.71 कोटी रुपयांची मुदत ठेवही गोठवण्यात आली आहे.
 

ed raids 6 locations in chhatrapati sambhajinagar bank fraud case, freezes rs 35.71 crore fd 
बँकेने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 2 जून 2023 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. CBIने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात मिळालेला निधी मंजूर केलेल्या व्यावसायिक उद्देशासाठी न वापरता बनावट तसेच शेल कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.
तपासादरम्यान या कथित गैरव्यवहारातील निधीतून रोख रक्कम काढण्यात आल्याचेही ईडीच्या निदर्शनास आले आहे. पैशांचा मूळ स्रोत लपवण्यासाठी अशा प्रकारे निधीची हाताळणी करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. छापेमारीत मिळालेली कागदपत्रे आणि अन्य साहित्य या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा तपास पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या रॅकेटविरोधातही ईडीने धडक कारवाई केली आहे. ईडीने अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसच्या सहकार्याने चंदीगड, हैदराबाद आणि पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर कारवाई केली. हैदराबाद आणि पुण्यातील चार कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आले असून, हैदराबादमध्ये बनावट डॉलर वाटपाशी संबंधित रॅकेटही आढळून आल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यातही अशाच प्रकारची फसवणूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पटियाला, पुणे आणि चंदीगडमधील या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीविरोधातील तपासाला वेग आला आहे. पटियालामधील दोन आणि पुण्यातील एका बनावट कॉल सेंटरचा तपास यंत्रणांनी पर्दाफाश केला. ईडीच्या पथकाने छापा टाकला तेव्हा या केंद्रांमध्ये सुमारे 220 जण काम करत असल्याचे आढळले. अमेरिकन नागरिकांना विविध खोटी कारणे सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईत ईडीने 66 मोबाईल फोन, 13 लॅपटॉप, हार्ड डिस्क, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. फसवणुकीतून मिळवलेले डॉलर भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणाची मदत घेतली जात होती, याचा तपास सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, पटियाला येथील एका घरातूनच बनावट कॉल सेंटरचे कामकाज चालवले जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.