पुणे,
FDA cracks down on The New Poona Club पुण्यातील कॅम्प परिसरातील द न्यू पूना क्लब लिमिटेडच्या स्वयंपाकघरातील अस्वच्छता अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आली आहे. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने एफडीएने क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात जिवंत झुरळे आणि इतर कीटक आढळले. याशिवाय उंदराची विष्ठा, साचलेले पाणी, तेलकट पृष्ठभाग आणि फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा नियमांमधील अनुसूची ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्न तयार केले जाणारे ठिकाण स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक असताना क्लबच्या स्वयंपाकघरात अस्वच्छ परिस्थिती आढळल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अन्न परवाना निलंबित करण्याची तातडीची कारवाई केली.

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे एफडीए विभागाने १० ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहीम राबवली. पुणे शहर तसेच जिल्ह्यातील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण १४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, लेबलिंगमधील त्रुटी, दिशाभूल करणारी माहिती आणि भेसळीचा संशय अशा कारणांमुळे ५६.३६ लाख रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला. या विशेष मोहिमेदरम्यान दौंड, मंचर, हडपसर, मोहम्मदवाडी, शिरूर, कॅम्प, वानवडी आणि कोंढवा या भागांमध्ये तपासणी करण्यात आली. द न्यू पूना क्लबव्यतिरिक्त मिठाईची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी आस्थापनांचीही झाडाझडती घेण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही ठिकाणी अन्न परवाने निलंबित करण्यात आले, तर काही आस्थापनांमधून संशयास्पद किंवा नियमबाह्य खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.