'क्या बात है' मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा

‘गोंधळ’ची ऑस्कर २०२७साठी भारताकडून अधिकृत निवड

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
मुंबई
gondhal movie मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरणारी मोठी घोषणा समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी, अर्थात ऑस्कर २०२७साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली असून, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI)ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
 

gondhal movie 
या निवडीमुळे ‘गोंधळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवण्याची संधी मिळाली आहे. आशयाची वेगळेपणाची मांडणी, प्रयोगशीलता आणि दर्जेदार कथानकामुळे मराठी चित्रपटांना यापूर्वीही देशभरातून प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली आहे. आता ‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी सिनेसृष्टीचे नाव पुन्हा एकदा जागतिक चित्रपटविश्वाच्या व्यासपीठावर पोहोचणार आहे.
दरवर्षी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताकडून एका चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केली जाते. यंदाच्या निवड प्रक्रियेत विविध भारतीय चित्रपटांचा विचार करण्यात आला आणि त्यातून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. त्यामुळे दिग्दर्शक संतोष डावखर यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी हा महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा टप्पा ठरला आहे.
‘गोंधळ’ला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून मिळालेली ही संधी केवळ चित्रपटाच्या टीमसाठीच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठीही विशेष महत्त्वाची आहे. मराठी भाषेतील चित्रपटांनी आपल्या आशयपूर्ण कथाकथनातून आणि वेगळ्या विषयांच्या मांडणीतून राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘गोंधळ’ला मिळालेली ऑस्कर प्रवेशिका मराठी सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आता ऑस्कर २०२७च्या पुढील प्रक्रियेत ‘गोंधळ’ भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, या चित्रपटाकडे देशभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मराठी भाषेतील या थ्रिलरला जागतिक व्यासपीठावर किती व्यापक प्रतिसाद मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.