१६ चेंडू, ३० धावा अन् बटलरच्या नावावर इतिहास!

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
लंडन,
History made in Buttler's name इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० धावांची खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. गुरुवारी झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत १४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १३व्या षटकातच लक्ष्य गाठत ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने अजिंक्य आघाडी घेतली आहे.१४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि अनेऊरिन डोनाल्ड यांनी इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी २८ चेंडूंमध्ये ५१ धावांची भागीदारी केली.
 
 

History made in Buttler 
 
डोनाल्ड पाचव्या षटकात २१ धावा करून बाद झाला, तर त्यानंतरच्या षटकात बटलरलाही माघारी परतावे लागले. बटलरने १६ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. ही खेळी त्याच्यासाठी विक्रमाच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्त्वाची ठरली.२००९ पासून टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या बटलरने या ३० धावांसह आपल्या टी-२० कारकिर्दीत १५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. या फॉरमॅटमध्ये १५ हजार धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला असून, सर्वाधिक टी-२० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्याने अव्वल स्थान मिळवले आहे. बटलरने वेस्ट इंडिजच्या कीरोन पोलार्डचा विक्रम मागे टाकला.
 
 
पोलार्डने ६७१ डावांमध्ये १४,९९९ धावा केल्या आहेत. बटलरने आतापर्यंत ५२८ टी-२० सामने खेळले असून, ४९७ डावांमध्ये ३५.४६च्या सरासरीने १५ हजार धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९ शतके आणि १०७ अर्धशतके आहेत.टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर १५ हजार धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. कीरोन पोलार्ड १४,९९९ धावांसह दुसऱ्या, अॅलेक्स हेल्स १४,५८१ धावांसह तिसऱ्या, ख्रिस गेल १४,५६२ धावांसह चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर १४,२८४ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा विराट कोहली या यादीत सहाव्या स्थानावर असून, त्याने ४३० सामन्यांमधील ४१३ डावांत १४,२१८ धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर १० शतके आणि ११८ अर्धशतके आहेत.