एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत भारत-बांगलादेश आमनेसामने

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली ,
India-Bangladesh face to face एशियन गेम्स २०२६ मधील महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जपानचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने मलेशियावर ८६ धावांनी मात करत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी गुरुवारी बांगलादेश आणि पाकिस्ताननेही अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले होते.जपानविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात नाणेफेक जिंकून हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्री चरणीच्या प्रभावी गोलंदाजीसमोर जपानचा संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांत गारद झाला. भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या षटकातच सामना आपल्या नावे केला. सलामीवीर शेफाली वर्माने अवघ्या १५ चेंडूंत ४० धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
 

India-Bangladesh face to face 
 
आता एशियन गेम्स २०२६ च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. अलीकडेच झालेल्या आशिया चषकाच्या उपांत्य फेरीतही भारताने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे, बांगलादेश आणि चीन यांच्यातील उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द झाला. स्पर्धेच्या नियमांनुसार चांगली क्रमवारी असलेल्या संघाला पुढे जाण्याचा फायदा मिळाल्याने चीन स्पर्धेबाहेर झाला आणि बांगलादेशने उपांत्य फेरीत प्रवेश केला.भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. हा सामना निस्शिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत.
 
 
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट होईल. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यामुळे अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले होते.