मोर्शी
morshi murder case वादातून महिलेची बेदम मारहाण करून हत्या केल्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनराज दशरत चढोकार (वय ३८, रा. पाळा, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वरूड येथील न्यायाधीश अमिताभ ए. पंचभाई यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
६ ऑगस्ट २०२२ रोजी धनराज चढोकार याचा रूपाली सराटकर यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. आरोपीने रूपाली यांना बेदम मारहाण केली. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह सालबर्डी-आठनेर रोडवरील नदीपात्रात फेकून देत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पाळा येथील पोलीस पाटील सागर ओंकारराव साठे यांच्या जबानी रिपोर्टवरून मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६८/२०२२ अन्वये भादंवि कलम ३०२ व २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन ठाणेदार श्रीराम लाबाडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध भौतिक व तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच अन्य कायदेशीर पुरावे संकलित केले. त्याआधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास, तसेच कलम २०१ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रकरण न्यायालयात सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि तुषार नंदकुमार चव्हाण यांनी प्रकरणाचा वेळोवेळी आढावा घेतला. सरकारी विधी अधिकारी अॅड. मंगेश भागवत व पैरवी अधिकारी मपोहवा पुनम होले यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.