अनिल कांबळे
नागपूर,
harassment case प्रेमसंबंध संपल्यानंतरही महिलेचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ व त्रास देणाऱ्या तरुणाला पारडी पोलिसांनी अटक केली. अक्षय कांबळे (३१) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये भंडारा येथे वास्तव्यास असताना महिलेची अक्षय कांबळे याच्याशी ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिला नोकरीच्या निमित्ताने नागपुरात राहण्यास आली. यानंतर अक्षय तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करीत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध संपवले. मात्र, त्यानंतरही अक्षय तिचा पाठलाग करून त्रास देत होता. १६ सप्टेंबरच्या पहाटे अक्षय दारूच्या नशेत महिलेच्या घरी पोहोचला. त्याने मोठमोठ्याने दरवाजा ठोठावून शिविगाळ केली. या प्रकारामुळे महिला भयभीत झाली. अक्षय तिच्या इच्छेविरुद्ध सातत्याने पाठलाग करून त्रास देत असल्याचे तिने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पारडी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून अक्षयला अटक केली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्याचीही पडताळणी करण्यात येत असून पुढील तपास पारडी पोलिस करीत आहेत.