महिला सुरक्षेसाठी नागपूर पोलिस सज्ज!

आजपासून निर्भया पथकाचा दरारा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अधिकृत घोषणा

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nirbhaya गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून आगामी काळात विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निर्भया पथके सज्ज केली आहेत. सध्या शहरातील महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रयोग म्हणून एकूण १२ निर्भया पथकांचा सराव करण्यात येणार आहेत. ही गस्तव्यवस्था येत्या काही दिवसांत संपूर्ण शहरभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
 
nagpur police ready for women
 
 
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळे, विसर्जन मार्ग, बाजारपेठा, प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकांकडून अशा संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे. महिलांशी गैरवर्तन, छेडछाड किंवा असुरक्षित वातावरण निर्माण करणाऱ्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या पथकांवर राहणार आहे. उत्सवाच्या काळात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर देण्यात येणार आहे. महिला किंवा युवतीला सार्वजनिक ठिकाणी त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यास निर्भया पथक घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणणार आहे. एखाद्या महिलेने स्वतःला असुरक्षित वाटत असल्याची माहिती दिल्यास तिच्या मदतीसाठीही पथक तत्काळ पुढाकार घेणार आहे. उत्तर परिक्षेत्रातील सहा निर्भया पथके अपर पोलिस आयुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली, तर दक्षिण परिक्षेत्रातील सहा पथके अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.
...........
गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली, महिलांचा पाठलाग करणे, गैरवर्तन किंवा छेडछाडीचे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येणार आहे. गरजेनुसार संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची राहणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तक्रार दुर्लक्षित केली जाणार नाही, याकडे पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
.............
महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सध्या निर्भया पथकांकडून प्रायोगिक तत्वावर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत निर्भया पथकाला अधिकृतरित्या निर्देश देऊन कार्यान्वित करण्यात येणार आहे.
- विश्वास नांगरे-पाटील (पोलिस आयुक्त, नागपूर शहर)