मशिदीत भीषण स्फोट; १६ जणांचा मृत्यू

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
पेशावर
pakistan blast पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये शुक्रवारी नमाजच्या वेळी मशिदीजवळ झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. जुन्या पोलीस लाइन्सजवळील मशिदीत हा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ५०हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये पाच पोलीस कर्मचारी आणि ११ नागरिकांचा समावेश असल्याचे खैबर पख्तूनख्वाचे पोलीस प्रमुख जुल्फिकार हमीद यांनी सांगितले.
 

pakistan blast mosque explosion in kohat leaves over 25 injured, rescue operation underway 
प्राथमिक माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेले वाहन जुन्या पोलीस लाइन्सजवळील परिसरात घुसवण्यात आले. त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे मशिदीच्या बाहेरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, भिंतीचा काही भागही कोसळला. स्फोटानंतर परिसरात गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची सशस्त्र हल्लेखोरांशी चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू ११२२ची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू करून जखमींना प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. कोहाटच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, मोठ्या संख्येने जखमींवर उपचार सुरू आहेत.
रेस्क्यू ११२२चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी पथके घटनास्थळी पोहोचल्याची आणि मदत व बचावकार्य सुरू केल्याची माहिती दिली. दरम्यान, स्फोटानंतर कोहाट-हंगू मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
खैबर पख्तूनख्वाचे पोलीस महानिरीक्षक जुल्फिकार हमीद यांनी घटनेची दखल घेत कोहाटच्या प्रादेशिक पोलीस अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला आहे. स्फोटाचे नेमके स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. खैबर पख्तूनख्वासह देशाच्या विविध भागांत सुरक्षा दल आणि नागरिकांना लक्ष्य करून हल्ले झाले आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांचा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) तसेच बलूच बंडखोर गटांविरोधात संघर्ष सुरू आहे. मात्र, कोहाटमधील या ताज्या हल्ल्यामागे नेमका कोणता गट आहे, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, स्फोटानंतर घटनास्थळी बचावकार्य आणि सुरक्षा कारवाई सुरूच असून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. जखमींची संख्या आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.