अनिल कांबळे
नागपूर,
xerox झेरॉक्स काढण्यासाठी नागरिकांकडून झेरॉक्स सेंटरच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे पाठविली जातात. सेंटर संचालक ही कागदपत्रे संगणक किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून त्यांच्या प्रती काढून देतो. झेरॉक्स मिळाल्यानंतर नागरिक तेथून निघून जातात; मात्र, पाठविलेल्या डिजिटल प्रती सेंटरच्या उपकरणांमध्ये राहू शकतात. त्यामुळे या कागदपत्रांचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेचा दाखला, टीसी, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या कागदपत्रांमध्ये नागरिकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा वापर अनधिकृत व्यवहार, बनावट कागदपत्रे किंवा इतर फसवणुकीसाठी होऊ शकतो. मोबाईल सिमकार्ड, बँकिंग व्यवहार, कर्ज, विविध शासकीय प्रक्रिया आदींसाठी ओळखपत्रांच्या प्रतींची मागणी होत असते. त्यामुळे झेरॉक्स सेंटरवर जमा झालेल्या कागदपत्रांच्या प्रती चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागरिकांचा वैयक्तिक डाटा मिळविण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या संस्था, मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रातील कंपन्यांकडून विविध माध्यमांचा वापर केला जातो. अशा वेळी झेरॉक्स सेंटरवर जमा झालेला नागरिकांचा डाटा चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेल्यास त्याचा व्यावसायिक कारणांसाठीही गैरवापर होऊ शकतो.
ही घ्यावी काळजी घ्यावी?
झेरॉक्ससाठी कागदपत्र देताना त्यावर ‘केवळ बँक खाते उघडण्यासाठी’ किंवा ‘केवळ सिमकार्डसाठी’ अशी नोंद करून त्याखाली तारीख टाकल्यास कागदपत्राचा अन्य कारणासाठी वापर करणे कठीण होऊ शकते. व्हॉट्सॲपवर कागदपत्र पाठविल्यानंतर झेरॉक्स काढून झाल्यावर संबंधित चॅटमधून ते डिलीट करण्याची विनंती सेंटर संचालकाला करावी. शक्य असल्यास नागरिकांनी स्वतःच्या उपस्थितीत फाईल, डाउनलोड केलेली प्रत आणि रीसायकल बिनमधील प्रत हटविण्यात आली आहे का, हे तपासावे. अत्यंत संवेदनशील कागदपत्रे अनावश्यकपणे व्हॉट्सॲपवर पाठविणे टाळावे.
गैरवापर केल्यास होणार कारवाई
झेरॉक्स सेंटर संचालकांनीही ग्राहकांची कागदपत्रे अनावश्यकपणे साठवायला नको. काम झाल्यानंतर डिजिटल प्रती कायमस्वरूपी नष्ट करण्याची सुरक्षित पद्धत अवलंबावी. नागरिकांनीही कागदपत्रांची गोपनीयता ही स्वतःची जबाबदारी मानून प्रत्येक वेळी आवश्यक ती खबरदारी घेतल्यास ओळख चोरी आणि कागदपत्रांच्या गैरवापराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. संचालकांनीही गैरवापर केल्यास कायदेशिर कारवाई होणार आहे.
वैयक्तिक कागदपत्रांचा किंवा शैक्षणिक गैरवापर कायद्याने गुन्हा आहे. सायबर गुन्हेगारसुद्धा कागदपत्रांचा गैरवापर करण्याची शक्यता असते. कुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे लक्षात आल्यास पोलिसांकडे रितसर तक्रार करावी.
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त)