लंडनहून परतले शिंदे अन् मोबाईल विसरले विमानात!

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Shinde left his mobile phone on plane उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौरा आटोपून मुंबईत परतल्यानंतर त्यांचा मोबाईल ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच राहिल्याची घटना समोर आली आहे. मुंबई विमानतळावरून घरी पोहोचल्यानंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास मोबाईल जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेला माहिती देण्यात आली आणि मोबाईल शोधण्यासाठी यंत्रणांची धावपळ सुरू झाली. विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. वृत्तांनुसार, शोध घेतल्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास मोबाईल मिळाला. मात्र, या घटनेबाबत शिंदे यांच्या कार्यालयाकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली असून, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

shinde 
एकनाथ शिंदे ५ सप्टेंबर रोजी आपल्या सहकाऱ्यांसह आठवडाभराच्या लंडन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये ‘कॉमनवेल्थ लीडरशिप रेकग्निशन’, ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप’ पुरस्कार आणि महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ असे तीन सन्मान त्यांना मिळाले. लंडनमधील त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान त्यांनी इंग्रजी भाषेत केलेले भाषण तसेच सहकाऱ्यांसोबत घेतलेला वडापाव चर्चेत आला होता. याच दौऱ्यात त्यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचीही भेट घेतली होती.
१२ सप्टेंबर रोजी लंडनहून मुंबईला परतल्यानंतर मोबाईल विमानात राहिल्याची माहिती समोर आली. मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती असल्याने तो परत मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांचा मोबाईल गहाळ झाल्याची घटना घडल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटिश एअरवेजच्या माहितीनुसार विमानात सापडलेल्या वस्तू आगमन विमानतळाच्या हरवलेल्या वस्तू विभागाकडे दिल्या जातात.