नवी दिल्ली,
Surendra Koli dies in Haridwar २००६ मधील देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुरेंद्र कोली शुक्रवारी हरिद्वारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. हरिद्वारमधील सप्तसरोवर मार्गावर लाल माता मंदिरासमोर असलेल्या चहाच्या ठेल्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांना प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा संशय असून घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. सुरेंद्र कोली गेल्या काही महिन्यांपासून हरिद्वारमध्ये राहत होता आणि अलीकडेच त्याने चहाचा ठेला सुरू केला होता.

२००६ मध्ये निठारी प्रकरण समोर आल्यानंतर मोनिंदर सिंह पंढेरच्या घरातील घरकाम करणारा सुरेंद्र कोली पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आला होता. पंढेर आणि कोली या दोघांवरही निठारीतील महिला व मुलांच्या हत्या प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले होते. निठारी गावात पंढेरच्या घरामागील नाल्यात मानवी सांगाडे आढळल्यानंतर २९ डिसेंबर २००६ रोजी या प्रकरणाचा देशभरात मोठा गाजावाजा झाला. या प्रकरणात सुरेंद्र कोलीविरोधात एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने १६ प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले होते. १३ फेब्रुवारी २००९ रोजी १४ वर्षीय रिम्पा हलदारवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने मोनिंदर सिंह पंढेर आणि सुरेंद्र कोली यांना मृत्युदंड सुनावला होता. मात्र, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत अनेक प्रकरणांमध्ये पुराव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
जानेवारी २०१५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दया याचिकेवरील निर्णयाला झालेल्या विलंबाचा आधार घेत कोलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने निठारीशी संबंधित १२ प्रकरणांत सुरेंद्र कोलीला निर्दोष मुक्त केले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही या निर्दोष मुक्ततेविरोधातील राज्याच्या अपीलांना नकार दिला. कोलीविरोधात एक प्रकरण मात्र प्रलंबित राहिले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या शेवटच्या प्रकरणातही त्याला निर्दोष मुक्त केल्याने सुमारे १९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्याची सुटका झाली. निठारी प्रकरणातील दोषसिद्धीचा आधार असलेल्या कबुलीजबाब आणि कथित जप्तीच्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयांनी प्रश्न उपस्थित केले होते. तपासादरम्यान पुरावे गोळा करण्याची पद्धत आणि प्रक्रियात्मक त्रुटींवरही न्यायालयीन निरीक्षणे नोंदवली गेली. त्यामुळे कोलीविरोधातील उर्वरित प्रकरणातील दोषसिद्धीही कायम ठेवता आली नाही. सर्वोच्च न्यायालयाने याच पार्श्वभूमीवर त्याला शेवटच्या प्रकरणातूनही निर्दोष मुक्त केले.
निठारी कांड उघडकीस आल्यानंतर गौतमबुद्ध नगर पोलिसांनी सुरुवातीला तपास केला होता. ११ जानेवारी २००७ रोजी तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. त्यानंतर निठारी येथील पंढेरच्या घराजवळून आणखी हाडे सापडली. २२ मे २००७ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने गाझियाबाद न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले. पुढील अनेक वर्षे या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू राहिली आणि विविध प्रकरणांत वेगवेगळे निकाल लागले.निठारी प्रकरणातील अनेक पीडितांच्या कुटुंबीयांना आपल्या मुलांच्या मृत्यूमागचे सत्य आणि दोषींना शिक्षा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, तपासातील त्रुटी आणि पुराव्यांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे प्रकरणाची न्यायालयीन दिशा बदलत गेली. सुरेंद्र कोलीच्या मृत्यूनंतर आता या बहुचर्चित प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.